आमच्या या आंदोलनाला अंत नाही
By admin | Published: April 11, 2016 01:57 AM2016-04-11T01:57:01+5:302016-04-11T01:57:01+5:30
अबकारी कर मागे घेण्याच्या मागणीसाठी आम्ही बेमुदत बंद पुकारला आहे. आता या आंदोलनाला ३८ दिवस पूर्ण झाले आहेत.
सराफा व्यावसायिकांचे आंदोलन : ग्राहक व व्यापाऱ्यांवर भुर्दंड
गोंदिया : अबकारी कर मागे घेण्याच्या मागणीसाठी आम्ही बेमुदत बंद पुकारला आहे. आता या आंदोलनाला ३८ दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र आंदोलनाचा अंत दिसत नाही. वर बसलेल्या असोसिएशनकडून फक्त संदेश मिळतो व त्यानुसार आमचे आंदोलन सुरू आहे. यात ग्राहक व व्यापाऱ्यांना भुर्दंड पडत आहे. ऐन लग्नसराईत ग्राहकांना भटकावे लागत आहे. या आंदोलनाचा सोक्षमोक्ष व्हावा हीच आमचीही इच्छा आहे. पण सरकार कठोर झाले आहे, अशी खंत गोंदिया सराफा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
लोकमत कार्यालयात या आंदोलनावर आयोजित परिचर्चेत हे पदाधिकारी सहभागी झाले होते. २ मार्चपासून येथील गोंदिया सराफा असोसिएशनने बंद पुकारला आहे. त्यांच्या आंदोलनाला घेऊन लोकमत कार्यालयात ही चर्चा आयोजित केली होती. असोसिएशनचे अध्यक्ष वासुदेव बरबटे यांनी सांगितले की, पूर्वी १२ कोटींवर एक्साईज ड्यूटी लावण्यात आली होती. यंदा सरकारने ६ कोटींवर एक्साईज ड्यूटी लावली आहे. भविष्यात यात आणखीही कपात केली जाऊ शकते. त्यामुळे व्यवसायी एक्साईजच्या कचाट्यात येतील व यापासून सुटका व्हावी यासाठी देशपातळीवर हे आंदोलन सुरू असल्याचे सांगीतले.
दिल्लीत बसलेल्या सराफा असोसिएशनचा संदेश येतो त्यानुसार आम्ही चालत आहोत. मध्यंतरी एक खोटा संदेश आला व त्याआधारे १९ ते २३ मार्च पर्यंत नागपूर येथील सराफा बाजार सुरू झाला होता. मात्र हे कळताच त्वरीत बाजार बंद करण्यात आला. या आंदोलनामुळे आमचे नुकसान होत आहेच, मात्र ग्राहकांचीही फसगत होत आहे. कारण सोने-चांदी ग्राहक फक्त विश्वसनीय दुकानातूनच खरेदी करतात. आमच्यातीलच काही दुकान उघडत आहेत. असे असले तरिही जिल्ह्यातील ९० टक्के व्यापार बंद असल्याचे असोसिएशनचे उपाध्यक्ष हिमांशू वस्तानी यांनी सांगीतले.
या आंदोलनाला घेऊन कॉंग्रेस शासन काळात भाजप तुमच्या सोबत होती यंदा कुणा पक्षाचे समर्थन का घेतले नाही यावर बोलताना, बरबटे यांनी सांगीतले की, राजकीय पक्षाला सोबत घेतल्यास पुढे जाऊन त्यांच्याही मागण्या वाढतील. शिवसेनेने आम्हाला समर्थन दिले आहे. आम आदमी पार्टीसह उत्तरप्रदेशात अखिलेश यादव यांचेही समर्थन मिळाले आहे. त्याचप्रकारे अन्य राजकीय पक्षांनीही स्वेच्छेने समर्थन देण्याची गरज असल्याचे सराफा असोसिएशनचे अध्यक्ष वासुदेव बरबटे, उपाध्यक्ष हिमांशू वस्तानी, आकाश छितरका, सहसचिव प्रितेश अग्रवाल, सदस्य आशिष जैन व अवि छितरका यांनी बोलून दाखविले. (शहर प्रतिनिधी)
जुन्या सोन्यावर १२.५० टक्के एक्साईज ड्युटी
सराफा व्यवसायींना व्यापार करताना एक टक्के एक्साईज ड्युटी लावण्यात आली आहे. त्यावरून आता हे वादळ उठले आहे. मात्र जुने सोने वितळवून नवे करून देण्यावर १२.५० टक्के एक्साईज ड्यूटी लावण्यात आली आहे. ही ड्युटी आम्हाला ग्राहकाकडूनच घ्यायची आहे. त्यामुळे हा कायदा व्यापारी व ग्राहकांच्या तोट्याचा ठरत आहे.
आता वाट ११ तारखेची
पदाधिकाऱ्यांनी सांगीतले की, या आंदोलनाचा अंत आम्हाला दिसत नाही. वर विचारले तर त्यांच्याकडून फक्त उपदेश दिला जात आहे. महिनाभर लोटला तरीही काही निर्णय न निघाल्याने सर्वांचा धिर खचत आहे. त्यात आता ११ तारखेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा संदेश वरून आला आहे. त्यामुळे ११ तारखेला काय होते याकडे आमचे लक्ष लागले आहे. अन्यथा आंदोलनाला घेऊन येथील असोसिएशनची बैठक घेऊन पुढे काय करायचे याचा निर्णय घेणार.
कारागीर व कर्मचाऱ्यांचे पगार सुरूच
महिनाभरापासून हे आंदोलन सुरू असून व्यवसाय बंद पडून आहे. त्यामुळे सराफा व्यवसायीकांची आवक काहीच नसून खर्च मात्र सुरूच आहेत. आम्ही बंदवर असलो तरिही आमच्या कारागिर व कर्मचाऱ्यांचा पगार सुरू असल्याने आम्ही अडचण अधिकच वाढत असल्याचेही सराफा व्यवसायीकांनी सांगीतले.
कायद्यामुळे आम्ही उत्पादक होणार
या कायद्यामुळे मुंबई येथील व्यवसायीकांकडून आम्ही माल मागविल्यास ते आमच्या नावाने बॅॅ्रडींग करून आम्हाला माल पाठवतील. त्यामुळे ते फक्त दलाल बनून काम करतील व आम्ही उत्पादकांच्या यादीत येवू. असे झाल्यास एक्साईजच्या या कायद्याच्या कचाट्यात आम्ही येणार आहोत. असे झाल्यास आमच्यासह कारागिर व ग्राहकांवरही याचा भुर्दंड पडणार.