आमची शाळा,आदर्श शाळा स्पर्धा जिल्ह्यात राबविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 09:35 PM2018-09-17T21:35:34+5:302018-09-17T21:35:49+5:30
अदानी फाऊंडेशनतर्फे तालुक्यात राबविण्यात येत असलेली आमची शाळा, आदर्श शाळा ही स्पर्धा शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रेरणादायी आहे. यामुळे नक्कीच शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार आहे. शिवाय विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक स्पर्धा निर्माण होवून त्यांचा सर्वांगिन विकास साधण्यास मदत होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : अदानी फाऊंडेशनतर्फे तालुक्यात राबविण्यात येत असलेली आमची शाळा, आदर्श शाळा ही स्पर्धा शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रेरणादायी आहे. यामुळे नक्कीच शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार आहे. शिवाय विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक स्पर्धा निर्माण होवून त्यांचा सर्वांगिन विकास साधण्यास मदत होणार आहे.
त्यामुळे ही स्पर्धा जिल्ह्याभरात राबविण्याचा मानस जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. एम.राजा.दयानिधी यांनी व्यक्त केला. आमची शाळा आदर्श शाळा स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम २०१७-१८ व २०१८-१९ या नवीन सत्राचा उद्घाटन कार्यक्रम नुकताच अदानी प्रकल्पाच्या सभागृहात पार पडला. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी उल्हास नरड,गटविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे, गटशिक्षणाधिकारी पी.पी.समरीत, शिक्षण विस्तार अधिकारी एम.डी.पारधी,अदानी प्रकल्प स्टेशन प्रमुख सी.पी.शाहु,आॅपरेशन अॅन्ड मेटनन्स प्रमुख समित मिश्रा, नितीन शिराळकर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. दयानिधी म्हणाले,अदानी प्रकल्पाने परिसरातील शैक्षणिक विकासासाठी घेतलेला पुढाकार खरोखरच कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता उंचाविण्यासाठी विविध उपक्रम राबवून त्यांना प्रोत्साहान देण्याची गरज आहे.
अदानी प्रकल्पासारखाच पुढाकार अन्य संस्थांनी घेतल्यास गोंदिया जिल्हा शिक्षणात नक्कीच भरारी घेईल,असा विश्वास व्यक्त केला. शिराळकर यांनी प्रास्ताविकातून अदानी प्रकल्पातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.
तसेच आमची शाळा, आदर्श शाळा स्पर्धेमागील उद्देश सांगितला. शाहू यांनी शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी अदानी फाऊंडेशनतर्फे विविध उपक्रम राबविले जात असल्याचे सांगितले.
या वेळी मागील सत्रातील विजेत्या स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या बक्षीस वितरण करण्यात आले.