बियाणांसाठी १,३९६ अर्जांतूृन १,३२७ शेतकऱ्यांचेच नशीब!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:22 AM2021-06-05T04:22:20+5:302021-06-05T04:22:20+5:30
गोंदिया : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत भात कडधान्य खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना अनुदानावर उपलब्ध करून दिले जात आहे. यासाठी शेतकऱ्यांकडून ...
गोंदिया : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत भात कडधान्य खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना अनुदानावर उपलब्ध करून दिले जात आहे. यासाठी शेतकऱ्यांकडून महाडीबीटी पोर्टलवर अर्ज मागविण्यात आले होते. अनुदानावरील बियाणांसाठी जिल्ह्यातील १,३९६ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. अर्ज अधिक आल्याने प्राप्त अर्जांची लॉटरी काढण्यात आली. १,३९६ अर्जांपैकी १,३२७ शेतकऱ्यांचे नशीब उजळले, तर ६९ शेतकरी वेटिंगवर आहेत. या शेतकऱ्यांना महाबीजच्या अधिकृत केंद्रावरून अनुदानावर बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना परमिट तालुका कृषी अधिकारी कार्यालयातून उपलब्ध करून दिले आहे. अनुदानावरील बियाणे वाटपाच्या दोन योजना असून, एका योजनेंतर्गत १०० टक्के, तर एका योजनेंतर्गत प्रतिक्विंटलमागे २० टक्के सूट दिली जात आहे. गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक धानाची लागवड केली जात असल्याने धानाच्या बियाणांच्या मागणीसाठी सर्वाधिक अर्ज आले आहेत.
..............
अनुदानित बियाणांसाठी आलेले अर्ज : १,३९६
लॉटरी किती जणांना : १,३२७
........
कोणत्या तालुक्यातून किती अर्ज
गोंदिया : २३४
गोरेगाव : १४५
तिरोडा : २६५
अर्जुनी मोरगाव : २९८
सडक अर्जुनी : १७५
सालेकसा : ८६
आमगाव : १६७
देवरी : १८०
.........................
महागडे बियाणे परवडणार कसे
खते आणि बियाणांच्या किमतीमध्ये दरवर्षी वाढ होत आहे. त्यामुळे शेतीच्या लागवड खर्चात वाढ झाली आहे. यंदा बियाणांचे दर क्विंटलमागे पाचशे ते सहा रुपयांनी वाढले आहे. त्यामुळे महागडे बियाणे खरेदी कसे खरेदी करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
-मंसाराम चिखलोंढे, शेतकरी
...................
मागील दीड वर्षापासून शेतकरी कोरोनाच्या संकटाला तोंड देत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. त्यातच आता बियाणे आणि खताच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने शेती करायची कशी, असा प्रश्न आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे उपलब्ध करून द्यावे.
-दिलीपसिंह गहरवार, शेतकरी
......
आधीच पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्याने आधीच शेतीचा लागवड खर्च वाढला आहे. त्यातच आता खते, बियाणांचे दरसुद्धा वाढल्याने शेतकरी आर्थिक संकटात आला आहे. त्यामुळे शासनाने यंदा शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर बियाणे उपलब्ध करून द्यावे.
-निहारीलाल दमाहे, शेतकरी
................