चारपैकी भाजपकडे तीन, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहणार एक मतदारसंघ?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 04:00 PM2024-10-09T16:00:38+5:302024-10-09T16:02:15+5:30
महायुतीचे सूत्र : एका मतदारसंघात नवीन चेहऱ्यांची चर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे जागावाटप अद्याप जाहीर झाले नाही. जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघ भाजपकडे आणि एक मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे राहणार असून, यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. भाजपकडे असलेल्या तीन मतदारसंघांपैकी एका मतदारसंघात भाजपकडून नवीन चेहऱ्याला संधी दिली जाणार असून, त्यासाठी चाचपणी केली जात असल्याची माहिती आहे.
पुढील आठवडाभरात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. तशा सूचना पक्षाकडून स्थानिक आमदार आणि नेत्यांना दिली आहे. त्यामुळेच सध्या मेळावे, भूमिपूजनाच्या कार्यक्रमांचा धडाका सुरू आहे, तर निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांनी मुंबई आणि नागपूरच्या वाऱ्या करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, ज्यांना उमेदवारी मिळण्याचा विश्वास आहे, त्यांनी शांतपणे आपले काम सुरू ठेवले आहे.
जिल्ह्यात गोंदिया, अर्जुनी मोरगाव, आमगाव, तिरोडा हे चार मतदारसंघ आहेत. यापैकी अर्जुनी मोरगाव मतदारसंघ सीटिंग गेटिंग या सूत्रानुसार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे राहणार असून, त्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे, तर आमगाव, गोंदिया तिरोडा मतदारसंघ भाजपकडे राहणार आहेत. यापैकी गोंदिया मतदारसंघातून आ. विनोद अग्रवाल हे, तर तिरोडा मतदारसंघातून विजय रहांगडाले यांना तिसऱ्यांदा भाजप मैदानात उतरविण्याची शक्यता आहे, तर आमगाव मतदारसंघात पक्ष नवीन चेहरा देते, की जुने ते सोने म्हणते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. उमेदवारी देताना भाजपने केलेल्या सर्वेक्षणाचा आधार घेतला जाणार असून, यात मेरिटवर असलेल्या उमेदवाराला उमेदवारी जाहीर होणार असल्याने भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.
गोंदिया आजी माजीमध्ये रंगणार सामना
गोंदिया विधानसभा क्षेत्रात भाजप विरुद्ध काँग्रेस सामना रंगणार असल्याचे भाजपचे आ. विनोद अग्रवाल यांचे निलंबन रद्द केल्यानंतर स्पष्ट झाले आहे. विद्यमान आ. विनोद अग्रवाल व काँग्रेसकडून माजी आ. गोपालदास अग्रवाल यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता असून, अपक्ष आणि तिसरा घटक यात किती मते घेतो, यावर विजयाचे समीकरण ठरणार आहे.
अर्जुनी मोरगाव मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
अर्जुनी मोरगाव मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे जाणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. विद्यमान आ. मनोहर चंद्रिकापुरे हे रिंगणात राहण्याची शक्यता आहे. असे झाल्यास गेल्या वर्षभरापासून तयारी करीत असलेले भाजपचे माजी मंत्री राजकुमार बडोले हे नेमकी काय भूमिका घेतात, हेदेखील महत्त्वपूर्ण ठरणार आहे, तर महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात इच्छुकांची संख्या बरीच आहे. त्यामुळे यातील इच्छुकांना डावलून नवीन चेहऱ्याला संधी दिल्यास याठिकाणी बंडखोरी होण्याची शक्यता आहे.