जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 05:00 AM2020-08-03T05:00:00+5:302020-08-03T05:00:50+5:30

कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात मागील तीन चार दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. रविवारी (दि.२) एकाच दिवशी तब्बल ६० कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर मागील तीन दिवसात एकूण १०७ कोरोना बाधित रुग्ण वाढल्याने जिल्ह्यात कोरोनाचा ब्लास्ट झाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची १४६ वर पोहचली आहे.

Outbreak of corona in the district | जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक

जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक

Next
ठळक मुद्देएकाच दिवशी ६० रुग्णांची नोंद : गोंदिया, तिरोडा तालुक्यात सर्वाधिक रुग्ण


लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात मागील तीन चार दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. रविवारी (दि.२) एकाच दिवशी तब्बल ६० कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर मागील तीन दिवसात एकूण १०७ कोरोना बाधित रुग्ण वाढल्याने जिल्ह्यात कोरोनाचा ब्लास्ट झाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची १४६ वर पोहचली आहे.
शनिवारी सुध्दा गोंदिया, तिरोडा आणि देवरी तालुक्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. गेल्या तीन दिवसातील कोरोना बाधितांच्या आकडेवारी नजर टाकल्यास रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रविवारी आढळलेल्या एकूण ६० कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक ३८ रुग्ण हे तिरोडा तालुक्यातील आहे. अदानी विद्युत प्रकल्पातील १९ कामगार, तिरोडा येथील गांधी वार्ड येथील एक रुग्ण, मुंडीकोटा व बेलाटी खुर्द येथील प्रत्येकी पाच, वडेगाव, पिपरिया, गोंडमोहाडी, पांजरा, पालडोंगरी, पाटीलटोला, काचेवाणी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. गोंदिया तालुक्यात आज दहा रुग्ण आढळले असून चार रुग्ण हे गोंदिया शहरातील सिंधी कॉलनीतील आहे. एक रुग्ण कुंभारेनगरचा, एक रुग्ण गौशाळा वार्डचा असून हा रुग्ण भोपाळ येथून आलेला आहे.एक रु ग्ण सेजगाव येथील असून तो पंजाब येथून आलेला आहे.
मुंडीपार येथे आढळून आलेला एक रुग्ण हा तेलंगाना येथून आलेला आहे. दोन रुग्ण हे मध्यप्रदेशातील बालाघाट येथून उपचारासाठी गोंदियात आला. देवरी तालुक्यात चार रुग्ण आढळले असून यामध्ये परसटोला, भागी, पुराडा व देवरी येथील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे. आमगाव तालुक्यातील चिरचाळबांध येथे दोन रुग्ण, सडक अर्जुनी तालुक्यातील हलबीटोला येथील एक रुग्ण असून तो छत्तीसगड येथून आलेला आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यात पाच रुग्ण आढळले असून दोन रुग्ण हे वडेगाव येथील तर तीन रुग्ण अर्जुनी मोरगाव येथील आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे बाहेरील राज्य आणि जिल्ह्यातून आलेले आहेत. यांच्या संपर्कात आलेल्यांमुळे आता स्थानिकांमध्ये सुध्दा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे.
प्रशासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्याने नागरिकांकडून सुध्दा नियमांचे काटेकोरपणे पालन होत नसल्याचे चित्र आहे. शहरातील बाजारपेठ आणि दुकानांमध्ये सुध्दा गर्दी वाढली असून फिजिकल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. शहरातील रस्त्यांवर सुध्दा लॉकडाऊन पूर्णपणे शिथिल झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. विशेष म्हणजे मागील पाच महिन्यापासून कोरोनामुक्त असलेल्या देवरी तालुक्यात सुध्दा आता कोरोनाचा शिरकाव झाला आहे. हा परिसर आता कोरोनाचे हॉटस्पाट होत आहे.
तिरोडा आणि गोंदिया शहरात सुध्दा मागील दोन कोरोना बांधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे तिरोडा नगर परिषदेने आता कडक लॉकडाऊन करण्याची तयारी सुरू केल्याची माहिती आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाला सुध्दा नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याची गरज आहे.

बाहेरुन येणाऱ्यावर वॉच नाहीच
जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होण्यास प्रतिबंध लावण्यासाठी सुरूवातीला जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याच्या सीमा सील केल्या होत्या. जिल्ह्यात बाहेरुन येणाऱ्यांची आरोग्य तपासणी केली जात होती. मात्र आता याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे सुध्दा जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने चित्र आहे.

नागरिकांनो करा नियमांचे पालन
जिल्ह्यात तीन दिवसात कोरोना बाधितांचा आकडा १०७ वर पोहचला आहे. ही जिल्हावासीयांसाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्य विभाग आणि प्रशासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडावे, मास्कचा वापर करावा, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे,दिवसभरात हात वांरवार धुवावे तसेच आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन लोकमतने केले आहे.

जिल्ह्यात १४६ कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्ण
रविवारी (दि.२) जिल्ह्यात एकाच दिवशी ६० कोरोना बाधितांची भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोना अ‍ॅक्टीव्ह रूग्णांचा संख्या १४६ वर पोहचली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३८६ कोरोना बाधित रुग्ण आढळले असून यापैकी २३० कोरोना बाधितांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ९६२४ जणांचे स्वॅब नमुने गोंदिया येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले.यापैकी ३८६ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. तर ९०४६ नमुने कोरोन निगेटिव्ह आले आहे. ७१ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे. १३८ नमुन्यांबाबत अद्याप अनिश्चितता आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांचा त्वरीत शोध हा रॅपिड अँटीजेन टेस्टच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील २४९३ व्यक्तींचे नमुने घेण्यात आले.यामध्ये २४८० जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. १३ जणांचे स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे.

Web Title: Outbreak of corona in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.