दुबईहून आलेल्यांमुळे जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 05:00 AM2020-06-16T05:00:00+5:302020-06-16T05:00:54+5:30
तिरोडा तालुक्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात रोजगारासाठी दुबई येथे गेलेले आहेत. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ते सुध्दा आता आपल्या स्वगृही परतत आहे. काही दिवसांपूर्वी दुबईहून ५० ते ६० जण जिल्ह्यात परतले असून त्यांना गोंदिया येथील स्वागत लॉनमध्ये क्वारंटाईन करुन ठेवण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तिरोडा तालुक्यातील रोजगारासाठी दुबई येथे गेलेले नागरिक आता आपल्या स्वगृही परतत आहे. शुक्रवारी याच तालुक्यातील दुबईहून परतलेले तीन जण कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर सोमवारी (दि.१५) पुन्हा दुबईहून परतलेल्या १४ जणांचे स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यातील कोरोना अॅक्टीव्ह रुग्णाचा आकडा आता १७ वर पोहचला आहे. चार दिवसात जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्याने जिल्हावासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.आत्तापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आलेले सर्व रुग्ण हे दुबई येथून आलेले असून यामुळे जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाला आहे.
तिरोडा तालुक्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात रोजगारासाठी दुबई येथे गेलेले आहेत. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ते सुध्दा आता आपल्या स्वगृही परतत आहे. काही दिवसांपूर्वी दुबईहून ५० ते ६० जण जिल्ह्यात परतले असून त्यांना गोंदिया येथील स्वागत लॉनमध्ये क्वारंटाईन करुन ठेवण्यात आले होते.कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने यासर्वांचे स्वॅब नमुने घेवून ते गोंदिया येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. यापैकी तीन जणांचे स्वॅब नमुने रविवारपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आले होते. तर सोमवारी आणखी १४ जणांचे स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे दुबईहून जिल्ह्यात परतलेल्या एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १७ वर पोहचली आहे. हे सर्व रुग्ण तिरोडा तालुक्यातील आहे. २१ मे रोजी एकाच दिवशी २७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. त्यानंतर आज १५ जून रोजी सर्वाधिक १४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाल्याने जिल्हावासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.१० जूनपर्यंत जिल्ह्यातील सर्व कोरोना बाधित कोरोनामुक्त झाल्याने जिल्हा कोरोनामुक्त झाला होता.पण दुबईहून परतलेल्या नागरिकांमुळे जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आत्तापर्यंत १३१६ स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले आहे.
क्वारंटाईनमध्ये ठेवल्याने गावात प्रादुर्भाव टळला
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी बाहेरुन येणाऱ्या नागरिकांना जिल्हा आणि तालुका स्तरावर असलेल्या शासकीय क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करुन ठेवले जात आहे. दुबईहून जिल्ह्यात परतलेल्या तिरोडा तालुक्यातील नागरिकांना गोंदिया येथील क्वारंटाईन कक्षात ठेवण्यात आले होते. त्यामुळे या नागरिकांचा गावकऱ्यांशी संपर्क आला नाही. परिणामी गावात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यास मदत झाली.
जिल्ह्यात एकूण ८६ कोरोना बाधित
सोमवारी एकाच दिवशी जिल्ह्यात १४ कोरोना बाधित आढळलेल्या जिल्ह्यातील आत्तापर्यंतच्या एकूण कोरोना बाधितांचा आकडा ८६ वर पोहचला आहे. यापैकी आत्तापर्यंत ६९ कोरोना बाधित कोरोनामुक्त झाले असून ते आपल्या घरी परतले आहेत. सध्या जिल्ह्यात एकूण १७ अॅक्टीव्ह कोरोना बाधित असून त्यांच्या गोंदिया येथील जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. तर ११४८ स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे.
असा आहे कोरोना बाधितांचा आलेख
जिल्ह्यात २६ मार्चला पहिला कोरोना बाधित आढळला होता. त्यानंतर जिल्हा ३९ दिवस कोरोनामुक्त होता. मात्र १९ मे रोजी जिल्ह्यात दोन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. २१ मे रोजी २७, २२ मे १०, २६ मे एक, २७ मे १, २८ मे ९, २९ मे ३, ३० मे ४, ३१ मे १, २ जून रोजी २, १२ जून १, १३ जून १, १४ जून १ आणि १५ जून रोजी १४ कोरोना बाधितांची नोंद झाली.