संतापजनक ! १३ वर्षीय शाळकरी मुलीचा विनयभंग ; शाळकरी मुली शहरात सुरक्षित नसल्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 02:49 PM2024-08-26T14:49:27+5:302024-08-26T14:51:13+5:30

मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल : पोलिसांनी केले आरोपीला अटक; सतत दोन दिवस केला पाठलाग

Outrageous! molestation of 13-year-old schoolgirl; Fear that school girls are not safe in the city | संतापजनक ! १३ वर्षीय शाळकरी मुलीचा विनयभंग ; शाळकरी मुली शहरात सुरक्षित नसल्याची भीती

Outrageous! molestation of 13-year-old schoolgirl; Fear that school girls are not safe in the city

लोकमत न्यूज नेटवर्क 
देवरी:
देशभरात महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांबाबत सर्वत्र संताप व्यक्त केला जात असतानाच येथे १३ वर्षीय शाळकरी मुलीचा दोनदा विनयभंग करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (दि. २३) उघडकीस आली. त्या मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपी खुशाल कैलास राऊत (१८, रा. परसटोला) या तरुणाला अटक केली आहे. मात्र, या घटनेमुळे अल्पवयीन शाळकरी मुली शहरात सुरक्षित नसल्याची भीती पीडित मुलीच्या पालकांसह समाजमनात निर्माण झाली आहे.


देवरी पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शिवाजी चौकात गुरुवारी (दि. २२) सकाळी १०:३० वाजता पीडित मुलगी आपल्या खासगी वसतिगृहातून शाळेत जात होती. दरम्यान, शिवाजी चौकातील स्टार कॉम्प्यटरजवळ आरोपी खशाल राऊत स्कूटीवर आला व त्याने मुलीचा हात पकडून मोबाइल घेण्यास सांगितले.


मुलीने नकार दिला असता, त्याने तिला मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि. २३) सकाळी १०:३० वाजता त्याने पीडित मुलीचा पाठलाग करीत शाळेसमोर तिचा हात पकडला व माझ्याशी बोल, नाही तर तुला मारेन, अशी धमकी देत तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत तिचा विनयभंग केला. यावर मुलगी जोरात ओरड लागल्याने आरोपीने तेथन पळ काढला. मुलीने घडलेली घटना वसतिगृह अधीक्षिकेला सांगून पोलिस ठाणे गाठले.


तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी शुक्रवारी भारतीय न्याय संहिता कलम ७४,७८, ३५, १(२), सहकलम ८,१२ लैंगिक अपराध बाल संरक्षण अधिनियम २०१२ अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी खुशाल राऊत याला अटक केली. देवरी पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला तुरुंगवासात पाठविले आहे. पुढील तपास सपोनि गंगाकचर करीत आहेत. 


शाळकरी मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर 
देवरी हे तालुक्याचे ठिकाण असल्याने ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या शाळकरी मुलींची संख्या जास्त प्रमाणात आहे. बसस्थानक ते शाळा व शाळा ते बसस्थानक यादरम्यान पायी जाताना शहरातील रोडरोमिओ मुलींना त्रास देताना आढळून येतात. परंतु या रोडरोमिओंवर कारवाई होत नाही. यातच पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ठिकाणी भरदिवसा शाळकरी मुलीवर विनयभंग झाल्याची घटना घडल्याने पालकांनी संताप व्यक्त करीत पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.


पोलिस बंदोबस्ताची गरज 
या घटनेनंतर शैक्षणिक संस्थांनी सुद्धा या या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी अशाच घटना घडत असताना 'लोकमत'ने पोलिस बंदोबस्तावर प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळेस पोलिस अधीक्षकांनी दखल घेत पोलिस बंदोबस्त वाढविला होता. परंतु आजघडीला शाळेच्या वेळेत शाळांच्या मार्गावर पोलिस बंदोबस्त दिसत नसल्याने अशा घटना घडत असून, यावर अंकुश कोण लावणार? असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे.

Web Title: Outrageous! molestation of 13-year-old schoolgirl; Fear that school girls are not safe in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.