अतिवृष्टीने झाले १० हजारवर हेक्टरमधील पिकांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 15:14 IST2024-10-10T15:11:39+5:302024-10-10T15:14:31+5:30
२५ हजार शेतकरी बाधित : गोंदिया तालुक्यात सर्वाधिक नुकसान

Over 10,000 hectares of crops were damaged due to heavy rain
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात गेल्या महिन्यात ८ ते १० सप्टेंबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीचे कृषी विभागांतर्गत पंचनामे करण्यात आले. त्यात १० हजारवर हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले असून, २५ हजार शेतकरी बाधित झाले आहेत. हा नुकसानीचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून शासनाला पाठविला जाणार असून, त्यानंतर नुकसानभरपाई जाहीर होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात २ लाख १० हजार हेक्टरवर विविध पिकांची लागवड करण्यात आली आहे. यात सर्वाधिक १ लाख ९६ हजार हेक्टर क्षेत्र धानाचे आहे. धानाची रोवणी झाल्यानंतर पीक वाढण्याच्या स्थितीत असताना ८ ते १० सप्टेंबरदरम्यान जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने अतिवृष्टीची नोंद झाली होती. अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाल्याने त्याचा सर्वाधिक फटका गोंदिया, आमगाव, देवरी, सालेकसा, सडक अर्जुनी या तालुक्यांना बसला होता.
नदी काठचे हजारो हेक्टरमधील पिके पाण्याखाली होती. त्यामुळे धानासह भाजीपाला व इतर पिकांचेसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश शासन आणि प्रशासनाने कृषी विभागाला दिले होते. कृषी विभागाच्या यंत्रणेने जिल्ह्यातील आठही तालुक्यातील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले. तसेच एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, याची दक्षता घेतली. त्यात अतिवृष्टीमुळे १० हजारवर हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले २५ हजारवर शेतकरी बाधित झाल्याचे पुढे आले. कृषी विभागातर्फे पंचनाम्याचा अंतिम अहवाल तयार करण्याचे काम सुरू असून, लवकरच हा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर केला जाणार आहे.
शेतकऱ्यांच्या नजरा नुकसानभरपाईकडे
अतिवृष्टीमुळे धानासह भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांना केलेला लागवड खर्चसुद्धा भरून निघण्याची शक्यता कमी असल्याने चिंता सतावत आहे. त्यामुळे नुकसानीच्या पंचनाम्याचा अहवाल सादर केल्यानंतर शासन नेमकी किती नुकसानभरपाई जाहीर करते, याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
सहा तालुक्यांना बसला सर्वाधिक फटका
गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीचा सर्वाधिक फटका हा गोंदिया, सालेकसा, आमगाव, तिरोडा, सडक अर्जुनी, देवरी या तालुक्यांतील शेतकऱ्यांना बसला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी साचल्याने धानाची रोवणी वाहून गेली तर काही शेतकऱ्यांचे धान सडल्याने त्यांना खरीप हंगामाला मुकण्याची वेळ आली आहे.
जिल्ह्यातील तालुकानिहाय बाधित शेतकरी व झालेले नुकसान
तालुका बाधित शेतकरी बाधित क्षेत्र हेक्टरमध्ये
गोंदिया १३७१५ ६०३५
अर्जुनी मोरगाव ३९ ५.९०
देवरी ११५१ ४६४. १६
गोरेगाव ४३२ १४७. १६
तिरोडा ४१९१ १८१. ८६
आमगाव ३८७८ १२५९.५७
सडक अर्जुनी १११३ २४४.४८