गारपीटग्रस्त २०० शेतकऱ्यांना वगळले
By admin | Published: December 28, 2015 01:55 AM2015-12-28T01:55:53+5:302015-12-28T01:55:53+5:30
मागील वर्षी गारपिटीमुळे तिरोडा तालुक्याच्या पालडोंगरी येथील जवळपास २७० शेतकऱ्यांना मोठाच नुकसान सहन करावा लागला.
आरोप ग्रामस्थांचा : कर्मचाऱ्यांनी केला भेदभाव
गोंदिया : मागील वर्षी गारपिटीमुळे तिरोडा तालुक्याच्या पालडोंगरी येथील जवळपास २७० शेतकऱ्यांना मोठाच नुकसान सहन करावा लागला. परंतु नुकसान सर्वे यादीतून २०० शेतकऱ्यांना वगळून केवळ ७० शेतकऱ्यांची नावे शासनाला देण्यात आली आहेत, असा आरोप पालडोंगरी येथील गणराज रहांगडाले व इतर शेतकऱ्यांनी केला आहे.
गेल्यावर्षी गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठेच नुकसान झाले. याबाबत सर्वे करून यादीसुद्धा तयार करण्यात आली होती. मात्र त्यातून २०० शेतकऱ्यांना वगळण्यात आले. याबाबत सदर २०० शेतकऱ्यांच्या सह्यानिशी तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना १८ डिसेंबर २०१५ रोजी निवेदन देण्यात आले. परंतु अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. शासनाच्या अनुदानापासून सदर शेतकऱ्यांना का वंचित ठेवण्यात आले? यादी तयार करणारे? व केवळ ७० शेतकऱ्यांचीच नावे का देण्यात आली? असे प्रश्न सदर शेतकरी विचारत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्यांच्या शेतात लाखोळी, जवस, गहू व हरभरा नसतानाही त्यांना यादीत समाविष्ट करण्यात आले. एकाच कुटुंबातील दोन-चार नावांचा समावेश करण्यात आला. तसचे बाकीच्या २०० शेतकऱ्यांना वगळण्यात आले. ज्यांच्या शेतात पीक होते, त्यांना शासनाच्या नुकसानग्रस्त यादीतून वगळण्यात आले. यामागे काहीतरी घोळ करण्यात आला, अशी दाट शंका नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. अशा कर्मचारी व पदाधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी नुकसानग्रस्तांनी केली आहे.
सदर प्रकाराबाबत तलाठी व ग्रामसेवकांना विचारणा केल्यावर त्यांनी माहीत नाही, असे उत्तर दिल्याचे रहांगडाले यांनी सांगितले. तर ज्या शेतकऱ्यांनी तलाठी कार्यालयात जावून नावे दिली होती, त्यांची नावेसुद्धा यादीत नाहीत.
सदर प्रकरणाची चौकशी करून शेतकऱ्यांना नुकसाग्रस्त यादीत समाविष्ट करावे व दोषी असलेल्या कर्मचारी व पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी वंचित ठरलेल्या शेतकऱ्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)