मागील २४ तासांत तीन महसूल मंडळात अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 10:08 PM2018-06-28T22:08:38+5:302018-06-28T22:09:36+5:30
जिल्ह्यात बुधवारी (दि.२७) दुपारी सुरू झालेल्या पावसाची रिपरिप गुरूवारी (दि.२८) दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत कायम होती. जिल्ह्यातील काही भागात चांगला पाऊस झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात बुधवारी (दि.२७) दुपारी सुरू झालेल्या पावसाची रिपरिप गुरूवारी (दि.२८) दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत कायम होती. जिल्ह्यातील काही भागात चांगला पाऊस झाला. मागील २४ तासात सरासरी ३७ मिमीे पावसाची नोंद झाली असून तीन महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
ज्या तीन महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी नोंद झाली. त्यात देवरी येथे सर्वाधिक ७९ मिमी, सडक-अर्जुनी येथे ८० मिमी व डव्वा येथे ७४.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मागील पंधरा ते वीस दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने जिल्ह्यातील पेरणीची कामे पूर्ण खोळंबली होती. २५ जूनपर्यंत जिल्ह्यात केवळ ३ टक्के पेरण्या झाल्या होत्या. तर पावसाअभावी पेरणी केलेले धानाचे पºहे सुध्दा वाळण्याच्या मार्गावर होते.
त्यामुळे दुबार पेरणी तर करावी लागणार नाही ना अशी चिंता शेतकऱ्यांना सतावित होती. पाऊस न झाल्यामुळे उकाडा वाढल्याने नागरिक त्रस्त झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांच्या नजरा आभाळाकडे लागल्या होत्या. बुधवारी दुपार पासूनच सुरू झालेल्या पावसाची रिपरिप गुरुवारी दुसऱ्या दिवशी सुध्दा कायम होती. पावसामुळे धानाचे पऱ्हे व इतर पिकांना सुध्दा संजीवनी मिळाली असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. सडक-अर्जुनी तालुक्यामध्ये केवळ तीन महसूल मंडळे आहेत. त्यापैकी सडक-अर्जुनी व डव्वा या दोन्ही मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. या तालुक्यात ७२.४१ मिमी पावसाची नोंद झालीे. इतर महसूल मंडळांमध्ये जेथे चांगला पाऊस झाला आहे. त्यात सौंदड ६३.०४ मिमी, तिगाव ५१.४, चिचगड ४१, महागाव ४६.२, बोंडगावदेवी ४१.३, ठाणेगाव ४३.७, वडेगाव ५९.४, तिरोडा ५३.२, गोंदिया ५८, रावणवाडी ५५ व रतनारा मंडळात ४५ मिमी पावसाची नोंद झाली. पावसामुळे शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचे संकट काही प्रमाणात टळले असले तरी अद्यापही शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.