एका बाधिताची मात, तर दोन रुग्णांची पडली भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:27 AM2021-08-01T04:27:05+5:302021-08-01T04:27:05+5:30
गोंदिया : मागील दोन दिवसांपासून रुग्णसंख्येत थोडी वाढ होत असल्याचे चित्र आहे. शनिवारी (दि.३१) एका बाधिताने कोरोनावर मात केली, ...
गोंदिया : मागील दोन दिवसांपासून रुग्णसंख्येत थोडी वाढ होत असल्याचे चित्र आहे. शनिवारी (दि.३१) एका बाधिताने कोरोनावर मात केली, तर दोन नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १४ वर पोहोचली आहे. संसर्ग आटोक्यात असला तरी जिल्हावासीयांनी खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने शनिवारी ५३१ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यात ५३१ नमुन्यांची आरटीपीसीआर, तर १७० नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात दोन नमुने कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.२८ टक्के आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आला असून, तीन तालुके पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे. पण, दोन दिवसांपासून रुग्ण संख्येत पुन्हा थोडी वाढ होत असल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे जिल्हावासीयांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन गरजेचे आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ४३५१३२ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी ४११९१ नमुने पॉझिटिव्ह आले. यात २१७५३९ नमुने आरटीपीसीआर, तर २१७५९९ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत ४११९२ कोरोना बाधित आढळले. यापैकी ४०४७७ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत १४ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
...........
५० टक्के लसीकरण पृूर्ण
कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी लसीकरण केले जात आहे. जिल्ह्यातील एकूण १९० केंद्रांवरून लसीकरण सुरू असून, आतापर्यंत ५९१८७३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. जवळपास ५० टक्के लसीकरण होत आले आहे.