दररोज ६३२ बाधितांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:30 AM2021-05-11T04:30:44+5:302021-05-11T04:30:44+5:30
गोंदिया : मे महिन्याची सुरुवात कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्हावासीयांसाठी थोडी दिलासादायक ठरली. १ ते १० मे दरम्यान रुग्णसंख्येत घट ...
गोंदिया : मे महिन्याची सुरुवात कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्हावासीयांसाठी थोडी दिलासादायक ठरली. १ ते १० मे दरम्यान रुग्णसंख्येत घट झाली असून कोरोनावर मात करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. दहा दिवसांत ६३२८ बाधितांनी कोरोनावर मात केली, तर ४५५० बाधितांची नोंद झाली आहे. एकंदरीत बाधित रुग्णांपेक्षा मात करणाऱ्या रुग्णांची संख्या १७७८ ने अधिक असून ही जिल्हावासीयांसाठी निश्चितच दिलासादायक बाब आहे.
जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोनाने कहर केला. बाधितांसह मृतकांच्या संख्येतसुद्धा सातत्याने वाढ होत असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण होते. त्यामुळे मे महिन्यात काय होणार अशी चिंता जिल्हावासीयांना सतावत होती. मात्र, मे महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट होण्यास सुरुवात झाली. बाधित रुग्णांपेक्षा मात करणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक होती. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दरसुद्धा ८७ टक्क्यांवर पोहोचला आहे, तर मृतकांच्या संख्येतसुद्धा बऱ्याच प्रमाणात घट झाली आहे. एप्रिल महिन्यात ३६५ बाधितांचा मृत्यू झाला, तर मे महिन्यात मागील दहा दिवसांत ७० बाधितांचा मृत्यू झाला आहे. १ ते १० मे दरम्यान जिल्ह्यात ४५५० रुग्णांची नोंद झाली, तर ६३२८ बाधितांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. या महिन्यात कोरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात असून ब्रेक द चेनअंतर्गत लागू करण्यात आलेल्या नवीन निर्बंधामुळे कोरोनाची साखळी खंडित करण्यास बऱ्याच प्रमाणात यश आले. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करणेसुद्धा तेवढेच आवश्यक आहे.
...........
संसर्ग आटोक्यात मात्र बिनधास्त वागू नका
जिल्ह्यात मागील दहा दिवसांत कोरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आला आहे. रुग्णसंख्येत घट झाली आहे. मात्र, धोका अजूनही पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी संसर्ग कमी झाला म्हणून बिनधास्त राहू नये, तर अधिक काळजी घ्यावी. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
...........
गर्दी करणे टाळणे
जीवनावश्यक वस्तूंसाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी ही दुकाने सकाळी ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास शासनाने सूट दिली आहे. मात्र, काही नागरिक नियमांचे उल्लघंन करून किराणा व भाजीपाला घेण्यासाठी बाजारपेठेत गर्दी करीत आहेत. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी बाजारपेठेमध्ये गर्दी टाळण्याची गरज आहे.
...............
दहा दिवसांत ७० बाधितांचा मृत्यू
जिल्ह्यात १ ते १० मे दरम्यान ७० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. मृतकांमध्ये ५५ ते ८० वर्षांवरील नागरिकांचा समावेश आहे. गंभीर आजार असलेल्या रुग्णांसाठी कोरोना अधिक घातक ठरत असून गंभीर आजाराच्या रुग्णांनी कोरोना संसर्ग काळात अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
.......
मागील दहा दिवसांत वाढलेले रुग्ण
१ मे ५५९, २ मे ५४८, ३ मे ५७२, ४ मे २४०, ५ मे ५१३, ६ मे ४२२, ७ मे ३९७, ८ मे ३६४, ९ मे ३१०,१० मे ६२५.
.........
मागील दहा दिवसांत कोरोनावर मात करणारे रुग्ण
१ मे ६२९, २ मे ९२४, ३ मे ६६२, ४ मे ६७५, ५ मे ५८३, ६ मे ४२२, ७ मे ६०३, ८ मे ५५५, ९ मे ४७६, १० मे ५७४.
.............
मृतकांची संख्या
१ मे ५, २ मे १६, ३ मे ९, ४ मे ४, ५ मे ६, ६ मे ८, ७ मे ३, ८ मे ७, ९ मे ७, १० मे ७
...............