मेडिकलच्या इमारत बांधकामातील निधीचा अडसर दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:21 AM2021-07-16T04:21:07+5:302021-07-16T04:21:07+5:30

गोंदिया : येथील मेडिकल कॉलेजच्या बांधकामाला निधीअभावी सुरुवात झाली नव्हती. बांधकामाला चार ते पाच वर्षे विलंब झाल्याने बांधकामाच्या खर्चात ...

Overcoming the obstacles of funding for the construction of medical buildings | मेडिकलच्या इमारत बांधकामातील निधीचा अडसर दूर

मेडिकलच्या इमारत बांधकामातील निधीचा अडसर दूर

Next

गोंदिया : येथील मेडिकल कॉलेजच्या बांधकामाला निधीअभावी सुरुवात झाली नव्हती. बांधकामाला चार ते पाच वर्षे विलंब झाल्याने बांधकामाच्या खर्चात वाढ झाली होती. त्यामुळे इमारत बांधकामात निधीचा अडसर निर्माण झाला होता. खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला होता. गुरुवारी (दि.१५) वैद्यकीय शिक्षण विभागाने मेडिकलच्या इमारत बांधकामासाठी ६८९ कोटी रुपयांच्या सुधारित अंदाज पत्रकाला प्रशासकीय मंजुरी बहाल केली आहे. त्यामुळे मेडिकलच्या इमारतीचा मार्ग सुकर झाला आहे.

गोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर जवळपास पाच वर्षांचा कालावधी लोटला. पण मेडिकलच्या इमारत बांधकामाला सुरुवात झाली नव्हती. परिणामी मेडिकलचा कारभार केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय आणि बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या इमारतीतून सुरू आहे. त्यामुळे बऱ्याच समस्या येत आहेत. मेडिकल कॉलेजचे बरेच विभाग जागा नसल्याने सुरू करण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे रुग्णांना सुद्धा मेडिकल कॉलेजचा फारसा उपयोग होत नव्हता. मेडिकलच्या डॉक्टर आणि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा यामुळे विविध अडचणींना तोंड द्यावे लागत होते. कुडवा परिसरात मेडिकल कॉलेजच्या इमारतीसाठी प्रशस्त जागा मंजूर करण्यात आली आहे, पण काही अडचणींमुळे हे बांधकाम रखडले होते. खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पुढाकार घेत मुख्यमंत्र्यासह, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसोबत चर्चा करून वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली होती. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनीसुद्धा गोंदिया येथे भेट देऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होेते. त्यानंतर गुरुवारी (दि.१५) राज्य शासनाने गोंदिया मेडिकल कॉलेजच्या इमारत बांधकामाच्या सुधारित अंदाजपत्रकाला मंजुरी दिली आहे. यासाठी ६८९ कोटी ४६ लाख ८१ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यासाठी निधीदेखील उपलब्ध करून दिल्याने मेडिकलच्या इमारत बांधकामाला लवकरच सुरुवात होणार आहे.

..........

विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा

गोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होऊन पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. सुरुवातीला ५० विद्यार्थ्यांच्या प्रवेशक्षमतेला मंजुरी देण्यात आली होती. आता ती १५० करण्यात आली आहे. यामुळे वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा याची मदत होणार आहे.

..............

२०० खाटांची संख्या वाढली

शहरातील कुडवा परिसरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. यासाठी ६८९ कोटी ४६ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकाला शासनाने मंजुरी दिली आहे. पूर्वी ४५० खाटांना मंजुरी दिली होती. आता त्यांची संख्या २०० ने वाढवित ६५० खाटा करण्यात आली आहे.

..........

गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याच्या दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूृर करण्यात आले. मात्र, राज्यातील तत्कालीन भाजप सरकारने याकडे दुर्लक्ष केले होते; जिल्हावासीयांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला. आता ६८९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने मेडिकलच्या इमारतीचा मार्ग माेकळा झाला आहे.

-प्रफुल्ल पटेल, खासदार

Web Title: Overcoming the obstacles of funding for the construction of medical buildings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.