स्टेरॉइड, सीटीस्कॅनचा अतिमारा ठरतोय कोरोना रुग्णांना घातक (डमी)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:48 AM2021-05-05T04:48:12+5:302021-05-05T04:48:12+5:30
गोंदिया : कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढल्याने कोरोना ओळखण्यासाठी आणि शरीरात कोरोनाचे किती विषाणू आहेत हे ओळखण्यासाठी सीटीस्कॅन करण्यात येते; ...
गोंदिया : कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढल्याने कोरोना ओळखण्यासाठी आणि शरीरात कोरोनाचे किती विषाणू आहेत हे ओळखण्यासाठी सीटीस्कॅन करण्यात येते; परंतु या सीटीस्कॅनचा अतिवापर झाल्यास तो रुग्णांच्या आरोग्यास धोका उत्पन्न करू शकतो, तसेच कोरोनाशी लढाईसाठी वापरण्यात येणाऱ्या स्टेरॉइडचा अतिवापर झाल्यास मनुष्याला त्याच्या गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते. कोरोना रुग्णांसाठी स्टेरॉइड, सीटीस्कॅनचा वापर केला जातो; परंतु या दोन्ही गोष्टी मोठ्या प्रमाणात वापरल्यास याचा मनुष्याच्या शरीरावर विपरीत परिणाम होतो. परिणामी गंभीर आजार याच्यामुळे होऊ शकतात. सीटीस्कॅन करण्याची गरज असेल तरच करा किंवा स्टेरॉइड वापरताना डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय वापरू नये, असे गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुडे यांनी सांगितले.
....................
बुरशीजन्य आजाराचा धोका
१) स्टेरॉइड या औषधामुळे बुरशीजन्य आजार उद्भवतात. कोरोना रुग्णांसाठी किंवा अन्य आजारांच्या रुग्णांसाठी स्टेरॉइड जीवनरक्षणाचे औषध म्हणून ओळखले जाते.
२) फुप्फुसात पाणी भरल्यानंतर ते पाणी कमी करण्यासाठी स्टेरॉइड या औषधाचा वापर केला जातो; परंतु या औषधाचा अतिवापर झाल्यास रुग्णाला स्थूलपणा येतो किंवा किडनी निकामी होण्याची शक्यता असते. यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या औषधाचा वापर करू नये.
........
१५० सीटीस्कॅन होतात दररोज
-कोरोनापूर्वी गोंदियात चार ते पाच सीटीस्कॅन व्हायचे; परंतु कोरोनामुळे १५० च्या वर सीटीस्कॅन दररोज होतात.
-महिन्याकाठी ४५०० सीटीस्कॅन एकट्या गोंदिया जिल्ह्यात होतात. शासकीयपेक्षा खासगी रुग्णालयांत सीटीस्कॅन करण्याचे मोठे प्रमाण गोंदिया जिल्ह्यात वाढले आहे.
- कोरोनाचे निदान स्पष्ट करावे म्हणून सीटीस्कॅन केले जाते; परंतु आवश्यक असेल तरच किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सीटीस्कॅन करू नये, असे तज्ज्ञांचे मत आहे.
......
एक सीटीस्कॅन म्हणजे २०० ते ३०० एक्सरे
एक एक्सरे करण्यासाठी क्ष-किरण जेवढी आपल्या शरीरात जातात त्याच्या २०० ते ३०० पट एका सीटीस्कॅनमुळे फरक पडतो. कोरोना रुग्णांसाठी १०० मीटरच्या आतच चाचणी होत असल्यामुळे याचा फारसा गंभीर परिणाम होत नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यापेक्षा अधिक प्रमाणात सीटीस्कॅन केल्यास त्वचा भाजण्याचा प्रकार होऊ शकतो. कर्करोग होऊ शकतो असे तज्ज्ञ म्हणाले.
.................
क्षुल्लक-क्षुल्लक कारणांसाठी किंवा कोविड डिटेक्ट करण्यासाठी सीटीस्कॅन करू नका, कोविडची लक्षणे खोकला, ताप, श्वसनास त्रास असला तरच डॉक्टरांच्या सल्लानुसारच सीटीस्कॅन करावे. डॉक्टरांचा सल्ला न घेता आपला मनमर्जी कारभार करू नये.
- डॉ. श्रीराम मते, रेडिओलॉजिस्ट मेडिकल कॉलेज, गोंदिया.
......