गोरेगाव ग्रामीण रुग्णालयात लागणार ऑक्सिजन प्लांट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:30 AM2021-05-08T04:30:15+5:302021-05-08T04:30:15+5:30
गोरेगाव : गोरेगाव ग्रामीण रुग्णालयात ५३ सिलिंडर प्रति दिवस निर्मिती करणारे ऑक्सिजन प्लांट लावण्यात येणार आहे. या ऑक्सिजन प्लांटमधून ...
गोरेगाव : गोरेगाव ग्रामीण रुग्णालयात ५३ सिलिंडर प्रति दिवस निर्मिती करणारे ऑक्सिजन प्लांट लावण्यात येणार आहे. या ऑक्सिजन प्लांटमधून पाइपलाइनद्वारे रुग्णाच्या बेडपर्यंत ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी आ.विजय रहांगडाले यांच्या स्थानिक विकास आमदार निधीतून ५३ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
ऑक्सिजन प्लांट बसविण्याच्या कामाला सुरुवात होणार असून, याद्वारे हवेतून ऑक्सिजन निर्माण होऊन ४० बेडला ऑक्सिजनचा पुरवठा होणार आहे. उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे २७ लक्ष किमतीचे ३० ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स व गोरेगाव ग्रामीण रुग्णालय येथे १८ लाख किमतीचे २० कॉन्सट्रेटर्स दिले आहे. याद्वारे हवेतून प्राणवायू निर्माण होऊन रुग्णांना प्राणवायूचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे गाेरेगाव आणि तिरोडा तालुक्यातील ऑक्सिजन पुरवठ्याची समस्या मार्गी लागणार आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यातच गोरेगाव आणि तिरोडा तालुक्यात सर्वाधिक वाढत आहे. त्यामुळे ऑक्सिजनची समस्या निर्माण होत आहे. परिणामी, रुग्णांची गैरसोय होत आहे. हीच बाब लक्षात घेत आ.विजय रहांगडाले यांनी ऑक्सिजन प्लांटसाठी स्थानिक विकास निधीतून निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे रुग्णांची समस्या मार्गी लागणार आहे.