पीएम केअर निधीतून उभारणार ऑक्सिजन प्लांट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:31 AM2021-05-20T04:31:06+5:302021-05-20T04:31:06+5:30
तिरोडा : मागील महिन्यात कोरोनाचा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला होता. त्यामुळे ऑक्सिजनसह बेडची समस्या निर्माण झाली होती. त्यातच ...
तिरोडा : मागील महिन्यात कोरोनाचा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला होता. त्यामुळे ऑक्सिजनसह बेडची समस्या निर्माण झाली होती. त्यातच आता कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याच अनुषंगाने तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात पीएम केअर निधीतून २०० लीटर क्षमतेचा ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार असल्याची माहिती आ. विजय रहांगडाले यांनी दिली.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तिरोडा आणि गोरेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात रुग्णांची नोंद झाली होती. मात्र ऑक्सिजन आणि बेडची सुविधा नसल्याने अनेक रुग्णांना गोंदियाला रेफर करावे लागले होते. यामुळे काही रुग्णांची गैरसोयसुद्धा झाली होती. ही वेळ परत येऊ नये यासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात आरोग्यविषयक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आ. विजय रहांगडाले हे सातत्याने प्रयत्नरत आहेत. ऑक्सिजन अभावी रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात पीएम केअर निधीतून उपजिल्हा रुग्णालयात हवेतून २०० लीटर प्रति मिनिट ऑक्सिजन निर्माण करणारे प्लांट उभारण्यात येणार आहे. प्लांट स्थापन करण्याकरिता बुधवारी केंद्राच्या चमूने जागेची पाहणी करून निरीक्षण केले. प्लांटचे काम येत्या १५ दिवसांत सुरू होणार असून, या प्लांटद्वारे २४ तासांत २.८८ लक्ष प्रति दिन ऑक्सिजन तयार होणार असल्याची माहिती आ. विजय रहांगडाले यांनी दिली.