दहा ग्रामीण रुग्णालयात उभारणार ऑक्सिजन प्लांट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 05:00 AM2021-05-03T05:00:00+5:302021-05-03T05:00:25+5:30
पालकमंत्री नवाब मलिक रविवारी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांसोबत संवाद साधला. पंधरा दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यात कोविडची परिस्थिती चिंताजनक होती. मात्र आता परिस्थिती बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आली आहे. कोविड केअर सेंटर आणि शासकीय रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविण्यात आली आहे. तसेच ऑक्सिजनयुक्त खाटांची संख्या वाढविल्याने रुग्णांची होणार गैरसोय आता दूर झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ग्रामीण भागात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. यात गंभीर रुग्णांचे प्रमाणदेखील अधिक आहे. बरेचदा गंभीर रुग्णांना रेफर करावे लागते. या सर्व अडचणी लक्षात घेता जिल्ह्यातील दहा ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येईल. केटीएस आणि पाॅलिटेक्निक कॉलेज येथे ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी वर्कआर्डरसुध्दा काढण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री नवाब मलिक यांनी रविवारी (दि.२) येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
पालकमंत्री नवाब मलिक रविवारी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांसोबत संवाद साधला. पंधरा दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यात कोविडची परिस्थिती चिंताजनक होती. मात्र आता परिस्थिती बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आली आहे. कोविड केअर सेंटर आणि शासकीय रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविण्यात आली आहे. तसेच ऑक्सिजनयुक्त खाटांची संख्या वाढविल्याने रुग्णांची होणार गैरसोय आता दूर झाली आहे. येथील जिल्हा क्रीडा संकुलात १२६ खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. रुग्णांची संख्या वाढल्यास येथील खाटांची संख्या १७० पर्यंत वाढविण्यात येणार असल्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. जिल्ह्याला ५ ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तर खनिकर्म विभागाच्या निधीतून पुन्हा तीन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येतील. जिल्ह्यात आता ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा नसून ते भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. एकंदरीत जिल्ह्यातील कोविड प्रतिबंधात्मक उपाययाेजना पूर्ण झाल्या असून परिस्थिती आटोक्यात असल्याचे सांगितले.
सहयोग हॉस्पिटलच्या घटनेची चौकशी सुरू
सहयोग हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या एका कोविड बाधित रुग्णाने हाॅस्पिटलच्या तिसऱ्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेची पोलीस विभागांतर्गत चौकशी सुरू असून सीसीटीव्ही फुटेजसुध्दा चेक करण्यात आले आहे. तसेच या रुग्णालयासंदर्भात काही तक्रारी असून त्यांची पोलीस विभागाच्या माध्यमातून चौकशी सुरू आहे. त्याचा अहवाल प्राप्त होताच कारवाई केली जाईल, असे पालकमंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.
रुग्णालयाच्या दर्शनी भागात दरपत्रक अनिवार्य
सर्व खासगी कोविड हॉस्पिटलला ते उपचारासाठी आकारत असलेल्या शुल्काचे दरपत्रक हॉस्पिटलच्या दर्शनी भागात लावण्याचे निर्देश देण्यात आले. या निर्देशाचे पालन करणाऱ्या हॉस्पिटलवर त्वरित कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री नवाब मलिक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
खरीप हंगामासाठी ३०० कोटी पीक कर्ज
येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना शेतीची कामे करण्यासाठी अडचण जाऊ नये यासाठी जिल्ह्याला ३०० कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. पीक कर्ज वाटपात राष्ट्रीयकृत बँक या बऱ्याच मागे असतात त्यामुळे या बँकांची बैठक घेऊन आवश्यक सूचना करण्यात येतील. दिलेले उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकावर कारवाई करण्यात येईल. खरीप हंगामासाठी खते, बियाणे यांचा बंफर स्टॉक उपलब्ध असून शेतकऱ्यांना अडचण जाणार नसल्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.