अत्यल्प काळात केटीएसमधील ऑक्सिजन प्लांट सज्ज ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:30 AM2021-05-06T04:30:51+5:302021-05-06T04:30:51+5:30
गोंदिया : कोरोनाकाळात जिल्ह्यातील ऑक्सिजन तुटवड्याची समस्या मार्गी लावण्यासाठी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात १३ केएल क्षमतेचा ऑक्सिजन प्लांट उभारण्यात ...
गोंदिया : कोरोनाकाळात जिल्ह्यातील ऑक्सिजन तुटवड्याची समस्या मार्गी लावण्यासाठी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात १३ केएल क्षमतेचा ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला. खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या पुढाकारामुळे अल्पावधीत हा ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला. त्यामुळे रुग्णांची ऑक्सिजनअभावी होणारी गैरसोय टाळण्यास मदत झाली आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. हीच अडचण लक्षात घेत खासदार प्रफुल्ल पटेल यांनी ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या आयनॉक्स कंपनीच्या संचालकाशी चर्चा करून जिल्ह्याला अविरतपणे ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास सांगितले. यानंतर या कंपनीकडून जिल्ह्यात ६० टन लिक्विट ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला. त्यामुळे ऑक्सिजन तुटवड्याच्या समस्येवर मात करण्यासाठी मदत झाली. गोंदिया येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात १३ केएल क्षमतेचा ऑक्सिजन प्लांटला राज्य सरकारची मंजुरी मिळविली. तसेच अदानी वीज प्रकल्पाच्या सीएसआर फंडामधून ऑक्सिजन टँक व जिल्हा नियोजन समितीतून एक कोटी ८० लाख रुपये मंजूर केले. केटीएसमधील ऑक्सिजन प्लांट त्वरित कार्यान्वित व्हावा यासाठी माजी आमदार राजेंद्र जैन यांनी सातत्यानेे पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यामुळे हा प्लांट उभारण्यास मदत झाली. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री नवाब मलिक यांनी ऑक्सिजन प्लांटची पाहणी करून लवकरात लवकर प्लांट कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले. आता हा ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित झाला असून, दोनशे ऑक्सिजन खाटांना प्राणवायूचा पुरवठा करण्यास मदत होणार आहे. लवकरच हा प्लांट पूृर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार असल्याचे माजी आमदार राजेंद्र जैन यांनी सांगितले. ऑक्सिजन प्लांट लवकरात लवकर कार्यान्वित केल्याबद्दल जिल्हावासीयांनी खासदार प्रफुल्ल पटेल यांचे आभार मानले आहे.
.......