लवकरच सुरू होणार मेडिकलमधील ऑक्सिजन प्लांट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 05:00 AM2021-04-16T05:00:00+5:302021-04-16T05:00:19+5:30

कोविड संकटावेळी खासदार प्रफुल्ल पटेल आणि तत्कालीन पालकमंत्री अनिल देशमुख यांनी केवळ आरोग्य सुविधेसाठी जिल्हा नियोजन समितीत (डीपीडीसी) ऑक्सिजन निर्मितीसाठी १ कोटी ९० लाखांचा निधी मंजूर केला होता. लवकरच त्याचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी  दीपककुमार मीणा यांनी पालकमंत्री नवाब मलिक व खासदार प्रफुल्ल पटेल यांना दिली. त्यामुळे ऑक्सिजनची समस्या लवकरच मार्गी लागणार आहे. 

Oxygen plant in Medical will start soon | लवकरच सुरू होणार मेडिकलमधील ऑक्सिजन प्लांट

लवकरच सुरू होणार मेडिकलमधील ऑक्सिजन प्लांट

Next
ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल यांच्या पाठपुराव्यानंतर पाऊल : १३ हजार लिटरचे ऑक्सिजन टँक

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोविड संकटाच्या काळात संपूर्ण राज्यासह गोंदिया जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य सेवेवरील ताण वाढला आहे. त्यातच ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. यावर मात करण्यासाठी खा. प्रफुल्ल पटेल यांच्या पुढाकाराने अदानी वीज प्रकल्पाच्या सीएसआर निधीतून मेडिकलमध्ये ऑक्सिजन प्लांटसाठी टँक उभारण्याचे काम सुरू आहे. याचे काम २० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे ऑक्सिजनची समस्या दूर होणार आहे. 
मेडिकलमध्ये ऑक्सिजन टँक उभारण्याचे काम ७५ टक्के पूर्ण झाले असून, उर्वरित २५ टक्के काम लवकरच पूर्ण केले जाणार आहे. ऑक्सिजन प्लांटसाठी जिल्हा नियोजन समितीतून १ कोटी ९० लाख रुपयांचा निधी तत्कालीन पालकमंत्री अनिल देशमुख यांनी मंजूर केला होता. त्यानंतर या कामाला वेग आला आहे. 
माजी आमदार राजेंद्र जैन यांनी नुकताच या प्लांटचा आढावा घेतला. अदानी वीज प्रकल्पाने आपल्या सीएसआर निधीतून शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन टँकचे काम सुरू केले आहे. ते काम जवळजवळ पूर्णत्वास येत आहे. २० एप्रिलपर्यंत सुमारे १३ हजार लिटरचे टँक लावण्याचे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर ऑक्सिजन सुविधेसाठी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा अदानी वीज प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खा. प्रफुल्ल पटेल यांच्याशी चर्चा करताना व्यक्त केली. 
कोविड संकटावेळी खासदार प्रफुल्ल पटेल आणि तत्कालीन पालकमंत्री अनिल देशमुख यांनी केवळ आरोग्य सुविधेसाठी जिल्हा नियोजन समितीत (डीपीडीसी) ऑक्सिजन निर्मितीसाठी १ कोटी ९० लाखांचा निधी मंजूर केला होता. लवकरच त्याचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी  दीपककुमार मीणा यांनी पालकमंत्री नवाब मलिक व खासदार प्रफुल्ल पटेल यांना दिली. त्यामुळे ऑक्सिजनची समस्या लवकरच मार्गी लागणार आहे. 

रेमडेसिविरचा तुटवडा लवकरच दूर होणार 
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दररोज वेगाने वाढत आहे. यात गंभीर रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने रेमेडसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. याचा काही औषधे विक्रेते गैरफायदा घेत असून, अतिरिक्त दाराने विक्री करीत असल्याची ओरड वाढली आहे. ही बाब लक्षात घेता, खा. पटेल यांनी या कंपनीच्या व्यवस्थापकांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी लवकरच रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे रेमडेसिविरचा स्टॉक लवकरच उपलब्ध होणार आहे. 

जिल्ह्यात वाढता कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता, रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी ऑक्सिजन प्लांट लवकरच सुरू करण्याबाबत अदानी प्रकल्पाचे अधिकारी व मेडिकलच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. येत्या पाच-सहा दिवसांत हा प्रकल्प सुरू होईल. 
- प्रफुल्ल पटेल, खासदार.

 

Web Title: Oxygen plant in Medical will start soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.