उद्योगांची गती मंदावली, कंपन्यांना कामगार, कामगारांना काम मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:30 AM2021-05-11T04:30:59+5:302021-05-11T04:30:59+5:30
गोंदिया : कोरोनाचा वाढता प्राादुर्भाव लक्षात घेता कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत लॉकडाऊन जाहीर केले ...
गोंदिया : कोरोनाचा वाढता प्राादुर्भाव लक्षात घेता कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत लॉकडाऊन जाहीर केले आहे. जवळपास महिनाभरापासून सर्वच उद्योगधंदे बंद आहेत. केवळ जीवनावश्यक वस्तूचे तयार करणारे उद्योग वगळता सर्वच उद्योग बंद अवस्थेत आहेत. मात्र सुरू असलेल्या उद्योगांना कामगार मिळत नसल्याने त्यांच्या समोर निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
गोंदिया जिल्हा धान उत्पादकांचा जिल्हा असून या जिल्ह्यात राईस मिलची संख्या सर्वाधिक आहे. राईस मिल उद्योग हा जीवनावश्यक वस्तूंच्या उद्योगात मोडत असल्याने सद्यस्थितीत ३०३ पैकी २८७ राईस मिल सुरू आहेत. त्यांना कच्चा माल उपलब्ध असला तरी कामगारांची समस्या भेडसावीत आहे. कोरोनामुळे बरेच बाहेरील जिल्ह्यातील कामगार आपल्या गावी परत गेले आहेत. त्यामुळे मिलिंगची प्रक्रिया करताना अडचण निर्माण होत आहे. जिल्ह्यात गोंदिया, गोरेगाव, देवरी, अर्जुनी मोरगाव, तिरोडा येथे एमआयडीसी आहे. या एमआयडीसीमधील केवळ जीवनावश्यक वस्तूंचे उद्योग सुरू असून इतर उद्योग बंद आहेत. त्यामुळे उद्योगाची गती मंदावल्याचे चित्र आहे.
.........
कच्च्या मालाची अडचण नाही
जिल्ह्यात सर्वाधिक राईस मिल उद्योग आहेत. हे उद्योग सुरू ठेवण्यासाठी आवश्यक असणार कच्चा माल म्हणजे धान सध्या भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र धानाची भरडाई करण्याची प्रक्रिया करण्यासाठी कामगारांची गरज असते. मात्र कोरोनामुळे कामगार मिळत नसल्याने राईस मिल उद्योजकांची अडचण निर्माण झाली आहे.
..........
उद्योजकांच्या अडचणी वेगळ्या
मागील वर्षीसुध्दा ऐन सीजनच्या काळात लॉकडाऊन जाहीर झालेले उद्योगधंदे तब्बल चार महिने बंद होते. त्यामुळे अनेक उद्योग डबघाईस आले होते. तर यंदा पुन्हा महिनाभरापासूून लॉॅकडाऊन असल्याने जीवनावश्यक वस्तूंची निर्मिती करणारे उद्योग वगळता इतर सर्वच उद्योग बंद आहेत. त्यामुळे उद्योजक संकटात आले आहेत.
- हुकुमचंद अग्रवाल, उद्योजक
.......
राईस मिल उद्योग जीवनावश्यक वस्तू निर्मिती करणाऱ्या उद्योगात मोडत असल्याने ते सुरू आहेत. मात्र महिनाभरापासून कामगार मिळत नसल्याने राईस मिल उद्योजकांनासुध्दा विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच लॉकडाऊनचा फटका उद्योगांना मोठ्या प्रमाणात बसला आहे.
- रोहित भालोटिया, उद्योजक
.........
मागील वर्षीसुध्दा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच उद्योगधंदे ठप्प होते. तर यंदासुध्दा तीच स्थिती आहे. कपडा, इलेक्ट्रिकसह इतर उद्योगांवरसुध्दा याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. ऐन सीजन निघून गेल्याने आता वर्षभर विक्रीसाठी बोलविलेले साहित्य गोदामात वर्षभर तसेच ठेवावे लागणार आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांचे देणे आणि इतर खर्च कुठून करायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
- राकेश अग्रवाल, उद्योजक
..............
कामगारांच्या प्रतिक्रिया
उद्योगधंदे सुरू असले तर नियमित रोजगार मिळतो, त्यामुळे रोजीरोटीची चिंता नसते. मात्र मागील महिनाभरापासून करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे रोजगार हिरावला असून कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
- बंडू उमक, कामगार
.......
गेल्या महिनाभरापासून लॉकडाऊनमुळे हाताला काम नाही, त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने मदतीची घोषणा केली, पण ती अद्यापही मिळाली नाही.
- तुमदेव पाल, कामगार
..............
औद्योगिक वसाहतीत सुरू असलेले उद्योग (टक्क्यांमध्ये )
गोंदिया ४५ टक्के
गोरेगाव ५ टक्के
देवरी ७ टक्केे
अर्जुनी मोरगाव ४ टक्के
तिरोडा ७० टक्के
................