जिल्ह्यात लसीकरणाची गती मंदावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:18 AM2021-07-24T04:18:28+5:302021-07-24T04:18:28+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने केलेला कहर बघता हा धोका पु्न्हा पत्करता येणार नसल्याने जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करण्यावर शासनाचा जोर ...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने केलेला कहर बघता हा धोका पु्न्हा पत्करता येणार नसल्याने जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करण्यावर शासनाचा जोर आहे. यातूनच जिल्ह्यात लसीकरणाला जोमात सुरूवात करण्यात आली आहे. यासाठी गावागावांत लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले असून विशेष शिबिर व मोबाईल टिमच्या माध्यमातून लसीकरणाची सुविधा नागरिकांना उपलब्ध करवून दिली जात आहे. विशेष म्हणजे, लसीकरणाचे महत्व जाणून नागरिकांनीही लसीकरणासाठी पुढाकार घेतला व त्यामुळे दिवसाला १००००-१५००० वर लसीकरणाची आकडेवारी गेली होती.
मात्र मागील काही दिवसांपासून लसीकरणाची गती पुु्न्हा मंदावल्याचे दिसत आहे. कारण, लसीकरणाची आकडेवारी आता ५००० च्या आत आल्याचे मागील दिवसांत दिसून येत आहे. विशेष म्हणजे, मध्यंतरी लसींचा पुरवठा नियमित होत नसल्याने कित्येकदा लसीकरणाला ब्रेक लावावा लागला होता. त्यामुळे लसीकरणावर परिणाम पडल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. सध्या जिल्ह्यात सुमारे ४२ टक्के लसीकरण झाले आहे.
--------------------------------
शेतीची कामे व पावसामुळेही उशीर
ग्रामीण भागात सध्या शेतीची कामे जोमात सुरू आहेत. अशात कोरोनाची लस घेतल्यास ताप आला तर २-३ दिवसांची रोजी बुडणार किंवा कामावर परिणाम पडणार यामुळेही ग्रामीण भागात लस घेण्याकडे नागरिक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. शिवाय पावसामुळेही लसीकरणावर परिणाम पडत आहे. कित्येकदा घरातील वयोवृद्ध मंडळींना नेण्यासाठी घरी कुणी राहत नसल्याने त्यांचे लसीकरण अडकले आहे. तर कित्येकांना अद्याप लसीला घेऊन भीती व संभ्रम असल्याने ते लस घेत नसल्याचे दिसत आहे.
-----------------------------------
जिल्ह्यातील लसीकरणाची आकडेवारी
तारीख (जुलै) आकडेवारी
१७ ३३९८
१८ ३०
१९ ६७२५
२० ४७०८
२१ ७२
२२ १८१३