हत्तींच्या हैदोसाने धानपीक भुईसपाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2022 09:54 PM2022-10-08T21:54:50+5:302022-10-08T21:55:46+5:30
जीवाच्या भीतीने अनेक शेतकऱ्यांनी शेतावर जाणेसुद्धा बंद केले आहे. शुक्रवारी हत्तींनी या परिसरातील शेतांमध्ये चांगलाच धुमाकूळ घातल्याने पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली आहे. ऋषी काशीराम बहेकार, सिताराम कवडू मेंढे, नरेंद्र खुशाल मेश्राम, गजानन खुशाल मेश्राम, बंडू रामटेके, देवदास चिमणकर, मारुती सावुस्कार या शेतकऱ्यांच्या धान पिकाचे मोठ्या प्रमाणावर हत्तींच्या कळपाने नुकसान केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध : या वनपरिक्षेत्रअंतर्गत कवठा वनक्षेत्रालगत शेतशिवारात हत्तींच्या कळपाने मोठ्या प्रमाणात धानपिकाचे नुकसान केले असून शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. हत्तीेंच्या शेतातील वावरामुळे धानपीक भुईसपाट झाले असून हाती आलेले पीक गमविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आल्याने चिंतेचे वातावरण आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कवठा शेत शिवारात शुक्रवार (दि. ७) रात्री आठ वाजताच्या दरम्यान हत्तींच्या कळपाने मोठ्या प्रमाणात धानपिकाचे नुकसान केले. मागील दहा ते बारा दिवसांपासून हत्तींच्या कळपाचा मुक्काम याच परिसरात असून हत्तींकडून धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे.
जीवाच्या भीतीने अनेक शेतकऱ्यांनी शेतावर जाणेसुद्धा बंद केले आहे. शुक्रवारी हत्तींनी या परिसरातील शेतांमध्ये चांगलाच धुमाकूळ घातल्याने पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली आहे. ऋषी काशीराम बहेकार, सिताराम कवडू मेंढे, नरेंद्र खुशाल मेश्राम, गजानन खुशाल मेश्राम, बंडू रामटेके, देवदास चिमणकर, मारुती सावुस्कार या शेतकऱ्यांच्या धान पिकाचे मोठ्या प्रमाणावर हत्तींच्या कळपाने नुकसान केले आहे.
कवठा परिसरात तसेच बोडदा परिसरात या हत्तींच्या कळपाची धास्ती शेतकऱ्यांनी घेतलेली आहे. रात्रीच्या वेळी हत्तींचा कळप गावांमध्ये येऊन जीवितहानी व वित्तहानी करणार तर नाही ना, या दहशतीत शेतकरी वावरत आहेत. वन विभागाने हत्तींचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत.
नुकसानग्रस्तांना शासकीय निकषाच्या चारपट मदत द्या
हत्तींच्या कळपाकडून धानपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना हाती आलेले पीक गमाविण्याची वेळ आली आहे. वनविभागाकडून नुकसानीची मिळणारी भरपाई ही फारच अल्प आहे. त्यामुळे शासनाने यात बदल करून हेक्टरी मिळणारी मदत वाढवून द्यावी. आता निकषाप्रमाणे एका हेक्टरला २५ हजार रुपयापर्यंत किंवा एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त २५ हजारापर्यंतची नुकसानभरपाई दिली जाते. ती ग्राह्य न धरता यात तीन ते चार पटीने वाढ करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेताच्या चारही बाजूला उपाययोजना म्हणून जाळीचे व तारांचे कुंपण देण्याची व्यवस्था वनविभागाने करण्याची मागणी होत आहे.
वनविभागाकडून रात्रीची गस्त
- वनविभागाकडून रात्रीची गस्त लावून हत्तींच्या हालचालीवर पाळत ठेवण्यात आली आहे. गावाशेजारी टायर पेटवून लोक हत्तीला गाव व शेतपिकापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. तरीही हत्ती रात्रीच्या वेळी गावातील शेतशिवारात येऊन मोठ्या प्रमाणात धानपिकांचे नुकसान करीत असल्याचे चित्र आहे. रात्रभर शेतातील नुकसान करून पहाटेच्या सुमारास जंगलाकडे निघून जात आहे. वनविभागाने याची दखल घेऊन हत्तींचा बंदोबस्त लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.