सोमवारपासून धान खरेदी सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:22 AM2021-06-06T04:22:31+5:302021-06-06T04:22:31+5:30
अर्जुनी मोरगाव : शासनाने भरडाईसाठी धानाची उचल केली नाही. खरीप हंगामाचा सुमारे अडीच लक्ष क्विंटल धान ४० गोदामात साठवलेला ...
अर्जुनी मोरगाव : शासनाने भरडाईसाठी धानाची उचल केली नाही. खरीप हंगामाचा सुमारे अडीच लक्ष क्विंटल धान ४० गोदामात साठवलेला आहे. परिणामतः रब्बी हंगामाच्या शेतमालाची खरेदी सुरू झाली नाही. गोदाम उपलब्ध झाल्याने येत्या सोमवारपासून धान खरेदी सुरू होईल, अशी माहिती तालुका खरेदी विक्री समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
खरेदी विक्री समितीला सहा धान खरेदी केंद्र मंजूर आहेत. १ नोव्हेंबर २०२० ते ३१ मार्च २०२१ या दरम्यान खरीप हंगामातील १०२५६ शेतकऱ्यांकडून २ लक्ष ४१ हजार ९१ क्विंटल धानाची खरेदी समितीने केली. धान खरेदी केंद्राला संलग्न असलेल्या गावातील ४० गोदामात हा धानसाठा पूर्ण क्षमतेने ठेवला आहे. शासनाने खरीप हंगामात खरेदी केलेल्या धानाची उचल न केल्यामुळे रब्बी हंगामाच्या धान खरेदीचा प्रश्न निर्माण झाला आहे. संस्थेच्या मालकीचे एक गोदाम धानाने पूर्ण भरलेले आहे. संस्थेने स्वनिधीतून बांधकाम केलेले दुसरे गोदाम दोन वर्षांपूर्वीच भाड्याने दिले आहे. मागील दोन वर्षांपासून गोदामाची अडचण निर्माण झाली नाही.
शासनाने शाळा, समाज मंदिर तसेच इतर शासकीय इमारती उपलब्ध असल्यास त्याची माहिती मागितली आहे. त्यानुसार गोंदियाच्या जिल्हा पणन अधिकाऱ्यांना पाठविण्यात आली आहे. काही धान खरेदी गोदाम उपलब्ध झाल्यामुळे संस्थेच्यावतीने सोमवारपासून खरेदी सुरू होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नामदेव कापगते, उपाध्यक्ष केवळराम पुस्तोडे, संचालक चामेश्वर गहाणे, लैलेश शिवणकर उपस्थित होते.