धान खरेदी प्रकरण ; सोसायटीच्या 15 संचालकांवर झाला गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2022 09:31 PM2022-10-14T21:31:48+5:302022-10-14T21:32:27+5:30

जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत शासकीय धान खरेदी केंद्रावर रब्बी हंगामात खरेदी करण्यात आलेल्या धानापैकी ४० हजार क्विंटल धान गायब असल्याचे बाब सर्वप्रथम ‘लोकमत’ने उघडकीस आणली होती. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. त्यात धान गायब असल्याचे स्पष्ट झाल्याने संबंधित सोसायटीवर गुन्हे दाखल करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. 

Paddy purchase case; A case has been registered against 15 directors of the society | धान खरेदी प्रकरण ; सोसायटीच्या 15 संचालकांवर झाला गुन्हा दाखल

धान खरेदी प्रकरण ; सोसायटीच्या 15 संचालकांवर झाला गुन्हा दाखल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शेतकऱ्यांच्या हक्काचे धान घेताना शेतकऱ्यांना लुबाडणे व शासनालाही लुटणे, या दोन्ही गोष्टी एकाच सोबत करणाऱ्या सालेकसा येथील समृद्ध किसान शेती उद्योग साधनसामग्री पुरवठा व खरेदी-विक्री सेवा सहकारी संस्था मर्यादित सालेकसा, नोंदणी क्रमांक १०७० च्या अध्यक्ष, सचिवासह १५ संचालक मंडळावर फसवणूक केल्याचा गुन्हा शुक्रवारी (दि. १४) दाखल करण्यात आला. या आरोपीवर जिल्हा पणन अधिकारी  मनोज बाजपेयी (४९) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. 
समृद्ध किसान संस्था सालेकसा या संस्थेने पणन महासंघासोबत केलेल्या करारनाम्याप्रमाणे व शासनाच्या वेळोवेळी निर्गमित करण्यात येणाऱ्या नियम व अटीच्या अधीन राहून धान खरेदी करायची होती. पणन हंगाम २०२१-२२ मध्ये या संस्थेने शेतकऱ्यांचे धान खरेदी केल्यानंतर त्याची साठवणूक करण्याची पूर्ण जबाबदारी येते. 
खरेदी केलेला धान पणन महासंघाच्या देण्यात आलेल्या डीओप्रमाणे भरडाई करण्याकरिता राईस मिलधारकांना धानाची उचल देणे बंधनकारक आहे; परंतु दिलेल्या डीओप्रमाणे समृद्ध किसान संस्था, सालेकसा यांनी मिलर्सना धान उचल दिला नाही. 
डीओ दिलेले मिलर्स यांनी धान उचल देत नसल्याबाबत जिल्हा पणन अधिकारी, गोंदिया यांच्याकडे लेखी तक्रार केली. समृद्ध किसान संस्थेस वेळोवेळी धान उचल देण्याकरिता नोटीस देण्यात आल्या आहेत. संस्थेकडून नोटीसचे उत्तर देण्यात आले नाही व धान उचलही देण्यात आले नाही. 
यासाठी संस्थेच्या गोदामांमध्ये धान साठ्याची पाहणी करण्याकरिता  १३ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी ४ वाजता दरम्यान मार्केटिंग अधिकारी मनाेज बाजपेयी, सहायक निबंधक, सालेकसा, श्रेणी- १ संजय गायधने, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी धनंजय यशवंत देशमुख, ज्ञानदेव तनपुरे, हरीष चेटुले पाहणी करण्यास गेले असता  समृद्ध किसान संस्थेने भाड्याने घेतलेल्या साकरीटोला येथील उर्मिला दोनोडे यांच्या मालकीचे गोदाम व रोंढा येथील अनिल अग्रवाल यांच्या मालकीचे गोदामात  ८ हजार क्विंटल धान नव्हता. त्या धानाची किंमत १ कोटी ५५ लाख २० हजार रुपये सांगितले जाते.

‘लोकमत’ने उघड केला होता घोळ 
- जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत शासकीय धान खरेदी केंद्रावर रब्बी हंगामात खरेदी करण्यात आलेल्या धानापैकी ४० हजार क्विंटल धान गायब असल्याचे बाब सर्वप्रथम ‘लोकमत’ने उघडकीस आणली होती. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. त्यात धान गायब असल्याचे स्पष्ट झाल्याने संबंधित सोसायटीवर गुन्हे दाखल करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. 

हंगाम २०२१-२२ मधील धानाची केली अफरातफर 

- महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडसोबत समृद्ध किसान संस्था सालेकसा या संस्थेने पणन महासंघासोबत केलेल्या करारनाम्याप्रमाणे व शासनाच्या वेळोवेळी निर्गमित करण्यात येणाऱ्या नियम व अटीच्या अधीन राहून धान खरेदीचे कार्य करायचे होते; परंतु तसे न करता पणन हंगाम २०२१-२२ मध्ये सदर संस्थेने शेतकऱ्यांचे धान खरेदी केल्यानंतर त्याची साठवणूक करण्याची पूर्ण जबाबदारी येते. खरेदी केलेला धान पणन महासंघाच्या देण्यात आलेल्या डीओप्रमाणे भरडाई करण्याकरिता मिलधारकांना धानाची उचल देणे बंधनकारक असताना  डीओप्रमाणे धान समृद्ध किसान संस्था, सालेकसा यांनी मिलर्सना दिलेच नाही. गोदामात धान शिल्लकच नव्हते.

त्या पाच संस्थाही रडारवर 
शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या धानाची परस्पर विल्हेवाट लावल्याचा प्रकार जिल्ह्यातील सहा केंद्रांवर आढळला होता. यापैकी एका सोसायटीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, उर्वरित पाच संस्थांची चौकशी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

आरोपीत यांचा समावेश 
- वासुदेव महादेव चुटे (रा. आमगाव खुर्द, सालेकसा), भोजलाल अंतुलाल बघेले, (रा. घोंशी), घनश्याम बहेकार (रा. ईसनाटोला),  रोशनलाल वसंतराव राणे (रा. लोहारा), प्रेमलाल तुरकर, घनश्याम नागपुरे (रा. मुंडीपार), राजेंद्र बहेकार (रा. बोदलबोडी), खेमराज उपराडे (रा. मुंडीपार), दालचंद मोहारे (रा. गोवारीटोला), ग्यानीराम नोणारे (रा. भजेपार), उमेश लहू वलथरे (मु.पो. गिरोला), व्यवस्थापक जगदीश खोब्रागडे (रा. सालेकसा), ग्रेडर अजय भरत फुंडे (रा. आमगाव खुर्द) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

 

Web Title: Paddy purchase case; A case has been registered against 15 directors of the society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.