धान खरेदी केंद्रावर सावळा गोंधळ कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 11:43 PM2019-06-06T23:43:50+5:302019-06-06T23:44:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत जिल्ह्यात धान खरेदी केंद्र सुरू करण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत जिल्ह्यात धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र या केंद्रावर सध्या दलालांचा सुळसुळाट असून दलालामार्फत येणाऱ्या धानाचे वजन आधी आणि शेतकऱ्यांच्या धानाचे वजन नंतर केले जात असल्याचे चित्र आहे. याप्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे.
जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी जिल्ह्यात ५७ धान खरेदी केंद्र सुरू केले आहे.यासाठी काही संस्थाशी खरेदीचा करार केला आहे. शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची गैरसोय होवू नये यासाठी टोकन पध्दतीने धान खरेदी सुरू केली. टोकन पध्दतीमुळे ज्या दिवशीचे टोकन शेतकऱ्यांना दिले त्या दिवशीच शेतकरी आपले धान विक्रीसाठी खरेदी केंद्रावर घेवून जातात. यामुळे खरेदी केंद्रावर आधीच धान नेऊन ठेवण्याची गरज भासत नाही. मात्र यानंतरही काही खरेदी केंद्रावर दलालामार्फत येणाºया धानाची आधी मोजणी केली जात असून टोकन नुसार नंबर येणाऱ्या शेतकऱ्यांना वेटींग ठेवले जात आहे. टोकनवाल्या शेतकऱ्यांच्या धानाचा काटा पंधरा पंधरा दिवस होत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. असा प्रकार गुरूवारी (दि.६) गोरेगाव तालुक्यातील धान खरेदी केंद्रावर पुढे आला.
टोकननुसार दिलेल्या तारखेनुसार धानाची विक्री करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याचे धान न घेता दलाला मार्फत आलेल्या शेतकऱ्यांच्या धानाची आधी मोजणी करण्यात आली. यामुळे सदर शेतकऱ्यांने संस्थेच्या पदाधिकारी व जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे तक्रार केली. मात्र त्यांनी लिखीत तक्रार करा असे सांगत याकडे दुर्लक्ष केले. खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतकरी रब्बीतील धानाची विक्री करुन खते, बियाणे घेण्याच्या लगबगीत आहे. मात्र खरेदी केंद्रावर त्यांची दिशाभूल होत असल्याने त्यांची आर्थिक कोंडी होत आहे.
यासंदर्भात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तक्रार प्राप्त झाल्यानंतर निश्चित कारवाही करु असे सांगितले.
रब्बीला बोनस नाहीच
शासनाने यंदा खरीप हंगामातील धानाला प्रती क्विंटल ५०० रुपये बोनस जाहीर केला होता. त्यामुळे रब्बी हंगामातील धानाला सुध्दा तो लागू राहिल अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र रब्बी हंगामातील धानाला बोनस मिळणार नसल्याचे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाºयांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे.