१४२ कोटी रुपयांची धान खरेदी अन् ५८ कोटी रुपयांचे चुकारे! १८ हजार ४२३ शेतकऱ्यांनी केली धानाची विक्री
By अंकुश गुंडावार | Published: December 9, 2023 08:31 PM2023-12-09T20:31:28+5:302023-12-09T20:31:48+5:30
शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत शासकीय धान खरेदी केंद्रावरून धान खरेदी केली जाते.
गोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावरून यंदा दिवाळीनंतर धान खरेदीला सुरुवात झाल्याने त्याचा धान खरेदीवर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. फेडरेशनने आतापर्यंत १६७ केंद्रांवरून ६ लाख ५२ हजार क्विंटल धानाची खरेदी केली आहे. खरेदी केलेल्या धानाची एकूण किंमत १४२ काेटी ३५ लाख ४७ हजार रुपये असून यापैकी आतापर्यंत केवळ ५८ कोटी रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत शासकीय धान खरेदी केंद्रावरून धान खरेदी केली जाते. मात्र यंदा धान खरेदी करणाऱ्या संस्थांना शासनाने नवीन निकष लावल्याने या संस्थांनी धान खरेदीवर बहिष्कार टाकला होता. परिणामी दिवाळीपूर्वी धान खरेदी सुरू न झाल्याने शेतकऱ्यांचा दिवाळ सण अंधारात गेला. यानंतर लोकप्रतिनिधीनी पाठपुरावा केल्यानंतर शासनाने अटी शिथिल करून जुन्याच निकषानुसार धान खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मागील पंधरा दिवसांपासून धान खरेदीला वेग आला आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या एकूण १६७ धान खरेदी केंद्रावरून आतापर्यंत ६ लाख ५२ हजार १०६ क्विंटल धान खरेदी १८४२३ शेतकऱ्यांकडून केली आहे. खरेदी केलेल्या एकूण धानाची किमत १४२ कोटी ३५ लाख ४७ हजार रुपये असून यापैकी केवळ ५८ कोटी ६१ लाख रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.
९२ हजार ७२८ शेतकऱ्यांनी केली नोंदणी
शासकीय धान खरेदी केंद्रावर हमीभावाने धानाची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना शासनाच्या एनईएमएल पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांना धानाची विक्री करता येत नाही. नोंदणी करण्यासाठी शासनाने ३१ डिसेंबरपर्यंत मुदत दिली असून आतापर्यंत जिल्ह्यातील ९२ हजार ७२८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.
तब्बल दहा दिवसांनंतर उघाड
जिल्ह्यात मागील आठ-दहा दिवसांपासून ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र शनिवारी (दि.९) ऊन निघाल्याने शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. तर धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी वाढली आहे.