इलेक्ट्रॉनिक काट्यावरच धान विक्री करावे
By admin | Published: May 26, 2017 12:39 AM2017-05-26T00:39:15+5:302017-05-26T00:39:15+5:30
तालुक्यात उन्हाळी हंगामाचे धानपीक निघाले असून शासनाचे हमीभाव धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे आवाहन : केंद्रावर ओलावा तपासणी यंत्र
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी मोरगाव : तालुक्यात उन्हाळी हंगामाचे धानपीक निघाले असून शासनाचे हमीभाव धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपले उन्हाळी हंगामातील धान हमीभाव धान खरेदी केंद्रावरच इलेक्ट्रॉनिक काट्यानेच विक्री करावे, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समिती अर्जुनी मोरगावचे सभापती काशीम जमा कुरेशी, उपसभापती लायकराम भेंडारकर व प्रभारी सचिव अशोक काळबांधे यांनी जाहीर पत्रकाद्वारे केले आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात उन्हाळी धान पिके लावण्यात आली आहेत. सध्या धानाचे पीकसुद्धा निघत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाचे हमी भाव धान खरेदी केंद्र अर्जुनी मोरगाव तालुक्यात १५ ठिकाणी सुरूही करण्यात आले आहेत. शासनाचे आधारभूत किंमत दर साधारण धान १ हजार ४७० रुपये प्रति क्विंटल व ‘अ’ ग्रेड धान १ हजार ५१० रुपये प्रति क्विंटल असून शेतकऱ्यांनी आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने धान विक्री करु नये, असे आवाहन बाजार समितीने केले असून धानाचे वजनमाप इलेक्ट्रॉनिक काट्यावरच करावे, असे आवाहनही केले. याबाबत शेतकऱ्यांना काही अडचणी उद्भवल्यास कृषी उत्पन्न बाजार समिती अर्जुनी मोरगावकडे लेखी तक्रार सादर करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्यात रबी पिकाच्या धान उत्पादनाचे वाढते प्रस्थ लक्षात घेता शासनाच्या वतीने यावर्षी आदिवासी सेवा सहकारी संस्थांचे बाराभाटी, पांढरवाणी, धाबेपवनी, गोठणगाव, केशोरी व इळदा या सहा ठिकाणी हमीभाव धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. तर लक्ष्मी भात गिरणी अर्जुनी मोरगाव व वि.से. सहकारी संस्था अर्जुनी मोरगाव येथे १-१ हमी भाव धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. तर दि तालुका खरेदी विक्री सहकारी संस्था अर्जुनी मोरगावच्या वतीने नवेगावबांध, महागाव, अर्जुनी मोरगाव २, तथा बोंडगावदेवी व वडेगाव(धाबेटेकडी) येथे हमीभाव केंद्र सुरू करण्यात आले आहे. तसेच कृषक शेती उद्योग साधन सामुग्री पुरवठा व खरेदी विक्री संस्था मर्या. भिवखिडकी येथेही हमीभाव धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे.
तालुक्यात सर्व मिळून १५ हमी भाव धान केंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीने दिली आहे. रबी पिकाचे धान हमीभाव केंद्रात सुरळीत व चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना विकता यावे, यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती अर्जुनी मोरगावच्या वतीने सर्व हमीभाव धान खरेदी केंद्रावर इलेक्ट्रॉनिक काटे पुरविण्यात आले आहेत. धानाचा ओलावा तपासण्यासाठी प्रत्येक खरेदी केंद्रावर आधुनिक आर्द्रता मापक यंत्र पुरविण्यात आले आहे. तसेच प्रत्येक हमीभाव धान खरेदी केंद्रावर मंडप, इतर व्यवस्था व पिण्याचे पाणी यासाठी बाजार समितीच्या माध्यमातून आर्थिक मदतसुद्धा पुरविण्यात येत असल्याची माहिती बाजार समितीने दिली आहे. तालुक्यातील हमीभाव धान खरेदी केंद्रावर धान विक्रीसाठी शेतकऱ्यांना काही अडचणी आल्यास कृषी उत्पन्न बाजार समितीकडे लेखी तक्रार करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.