रेल्वे स्थानकावर पाकीटमारी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 10:27 PM2017-09-11T22:27:56+5:302017-09-11T22:28:36+5:30
अत्याधुनिक होत असलेले गोंदियाचे रेल्वे स्थानक सध्या पाकीटमारीच्या घटनांनी कुप्रसिद्ध होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : अत्याधुनिक होत असलेले गोंदियाचे रेल्वे स्थानक सध्या पाकीटमारीच्या घटनांनी कुप्रसिद्ध होत आहे. रेल्वे गाडी फलाटावर थांबताच प्रवासी गाडीत चढण्याच्या तयारीत असताना नेमक्या त्याच वेळी अनेक प्रवाशांच्या पँटच्या मागील खिशातून पाकीट गायब होते. अशा अनेक घटना सांगण्यासाठी प्रवासी रेल्वे पोलीस ठाणे गाठत आहेत.
गोंदियाच्या रेल्वे स्थानकावर वाढणाºया पाकीटमारीच्या घटनांकडे रेल्वे पोलिसांनी लक्ष देवून पाकीटमारांना पकडणे गरजेचे आहे. गाडीत चढणाºया प्रवाशांचे पाकीट मारले जाते, त्यानंतर त्यातील रूपये काढून काही वेळाने ते पाकीट इतरत्र फेकलेसुद्धा जाते. विशेष म्हणजे रूपये काढून गाडीतील शौचालयाच्या ठिकाणातून रेल्वे रूळावर फेकले जाते. त्यामुळे रेल्वे रूळावर पैसे नसलेले अनेक पाकीटही आढळले आहेत.
उल्लेखनीय म्हणजे प्रवाशांच्या पाकिटातील केवळ पैसेच काढून घेतले जातात. मात्र पाकिटात पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, एटीएम कार्ड तसेच ठेवल्याचेही आढळले आहेत.
तसेच पाकिटात एखाद्याचा संपर्क क्रमांक आढळला तर रेल्वे पोलीस त्या क्रमांकावर संपर्क साधून पाकीट व त्यातील साहित्य त्यांना परत करण्याचे सौजन्य दाखवितात. मात्र पाकीटमारांवर कारवाई होताना किंवा प्रवासी गाडी आल्यावर पाकीटमारांवर किंवा चोरांवर नजर ठेवण्यासाठी रेल्वे पोलीस कुठेही दिसत नाही.
तीन दिवसांपूर्वीच शासकीय नोकरीत कार्यरत युवकाचे पाकीट गोंदियाच्या रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म-३ वर सायंकाळी पॅसेंजर गाडीत चढताना चोरट्याने लांबविले. गाडीत बसल्यानंतर त्या युवकाला आपल्या खिशात पाकीट नसल्याचे जाणवले. त्यात अडीज हजार रूपये रोख, ड्रायव्हिंग लायसन्स, तीन एटीएम कार्ड आदी साहित्य होते.
तर अशाचप्रकारे दुसºया एका घटनेत महिनाभरापूर्वी एका अपडाऊन करणाºया कर्मचाºयाला प्लॅटफॉर्म-३ च्या रेल्वे रूळावर पाकीट पडून असल्याचे आढळले. त्याने ते पाकीट उचलून पोलीस ठाण्यात नेवून दिले. त्या पाकिटात गोंदियातीलच इसमाचे ओळखपत्र, संपर्क क्रमांक, एटीएम कार्ड आदी साहित्य होते.
त्यामुळे पोलिसांनी त्याच्याशी संपर्क साधून पाकीट व आतील साहित्य त्याला परत दिले. सर्व अधिकतर पाकीटमारी प्रकरणात केवळ रोख पैसे काढून इतर साहित्य पाकीटसह फेकून दिले जात असल्याचे समजते. या प्रकाराकडे रेल्वे पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे आहे.