पलखेडा ग्रामस्थ अर्थतज्ज्ञच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2016 01:53 AM2016-06-30T01:53:54+5:302016-06-30T01:53:54+5:30

पलखेडासारख्या आदिवासीबहुल गावातील प्राथमिक शाळेला जिल्ह्यातील पहिली डिजीटल शाळा होण्याचा मान मिळाला आहे.

Palkheda Rural economist | पलखेडा ग्रामस्थ अर्थतज्ज्ञच

पलखेडा ग्रामस्थ अर्थतज्ज्ञच

Next

जिल्हाधिकाऱ्यांचे कौतुकोद्गार : पलखेड्यासह विविध ठिकाणच्या शाळांत नवागतांचे स्वागत
गोंदिया : पलखेडासारख्या आदिवासीबहुल गावातील प्राथमिक शाळेला जिल्ह्यातील पहिली डिजीटल शाळा होण्याचा मान मिळाला आहे. डिजीटल शाळेसाठी ग्रामस्थांनी लोकवर्गणी गोळा केली. यावरु न त्यांना शिक्षणाचे महत्व कळले आहे हे दिसून येते. नेमकी कुठे गुंतवणूक करावी हे त्यांना चांगल्या प्रकारे माहीत आहे. शिक्षणासाठी केलेल्या गुंतवणुकीवरून पलखेडा ग्रामस्थ खऱ्या अर्थाने अर्थतज्ज्ञच असल्याचे दिसून येते, असे कौतुकपर उद्गार जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी काढले.
२७ जून रोजी शाळा प्रवेशोत्सवानिमित्त गोरेगाव तालुक्यातील पलखेडा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पहिल्या वर्गात नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या शाळा प्रवेशोत्सव स्वागत कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून डॉ.सूर्यवंशी बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, शिक्षणाधिकारी (प्राथ.) उल्हास नरड, सरपंच चंद्रकला सयाम, उपसरपंच बिसेन, शाळा सुधार समितीचे अध्यक्ष हेमराज सयाम, श्रीमती सूर्यवंशी, श्रीमती पुलकुंडवार, श्रीमती नरड यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.सूर्यवंशी म्हणाले, पलखेडा शाळेपासून अनेक शाळांनी डिजीटल शाळा करण्याची प्रेरणा घेतली आहे. आपल्या गावातील मुले शिक्षण घेऊन चांगल्या मोठ्या पदावर गेली पाहिजे यासाठी त्यांना प्राथमिक शाळेत कोणकोणत्या सुविधा आपल्याकडून देता येईल यासाठी लोकसहभागातून ग्रामस्थांनी मदत केली आहे. खऱ्या अर्थाने ज्ञानदान करणाऱ्या या शाळेची आवारभिंत येत्या तीन मिहन्यात पूर्ण करण्यात येईल. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून डिजीटल शाळांसाठी सॉफ्टवेअर खरेदी करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
डॉ.पुलकुंडवार म्हणाले, जिल्ह्यातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी स्वत:ला वाहून घेतले आहे. लोकसहभागातून तयार करण्यात आलेल्या डिजीटल शाळांवरून हे दिसून येते. गाव हा आपला परिवार आहे, हे मानून शिक्षक काम करताना दिसत आहेत. विद्यार्थ्यांनी मिळालेल्या टॅबचा वापर अभ्यासासाठी करून जास्तीत जास्त ज्ञान ग्रहण करावे. जिल्ह्यातील सर्व शाळा नाविन्यपूर्ण योजनेच्या निधीतून डिजीटल करण्यात येणार आहेत. यासाठी पालकमंत्री सुध्दा आग्रही आहे. देशाची ही भावी पिढी चांगली घडली पाहिजे यासाठी पलखेडाच्या मुलांनी चांगले शिक्षण घेऊन यशाची शिखरे गाठावीत अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
शिक्षणाधिकारी नरड म्हणाले, शिक्षणासाठी गोंदिया जिल्हा हा राज्यात रोल मॉडेल ठरत आहे. जिल्ह्यात डिजीटल शाळा व इतर उपक्रमांसाठी ३ कोटी रुपये लोकसहभागातून जमा करण्यात आले आहेत. मुलांना स्वच्छतेचे महत्व पटवून देणाऱ्या हात धुवा या अभियानानंतर किशोरवयीन मुलींसाठी प्रबोधनाचा कार्यक्र म राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. पहिल्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा खाऊ, पुस्तके, भेटवस्तू व पुष्पगुच्छ देवून मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
चौथीच्या विद्यार्थ्यांना ९ टॅबचे वितरण करण्यात आले. शाळेच्या विकासासाठी ५० हजार रुपये देणगी दिलेल्या डॉ.नरेंद्रकुमार बहेकार यांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीराम बहेकार यांनी शाळेच्या विकासासाठी १० हजार रु पये रक्कम देणगी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना दिली. त्यांचाही सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी यांची रांगोळी काढणाऱ्या मंडल या शिक्षकाचाही सपत्निक सत्कार केला. कार्यक्रमाला पलखेडा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक केंद्रप्रमुख आगडे यांनी केले. संचालन शिक्षक युवराज माने यांनी केले, तर उपस्थितांचे आभार मुख्याध्यापिका कुसुम भोयर यांनी मानले. कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सचिव के.बी.ठाकरे यांनी परिश्रम घेतले. (जिल्हा प्रतिनिधी)
जि.प.शाळा बिजेपार
बिजेपार : जि.प.केंद्रीय माध्यमिक शाळा बिजेपार येथे पंचायत समिती सदस्य दिलीप वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थ्याना शाळेच्या पहिल्या दिवशी गोेड खाऊ वाटून तसेच नवीन कपडे, शैक्षणिक साहित्य देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक वाय.डी.जांभुळकर, शिक्षक यु.बी.नांदगाये, चौरे व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ललीता हेरणे हजर होते.
वाघमारे यांनी कॉन्व्हेंट संस्कृतीमुळे जि.प.शाळांना मुले मिळण्यास त्रास जातो, त्यामुळे आपल्या जि.प.शाळेतील सर्व शिक्षकांनी खाजगी शाळेच्या तुलनेत आम्ही कुठेही कमी नाही व आम्ही सरस आहेत हे सिध्द करण्याची आता काळाची घेण्याची गरज असल्याचे सांगितले. आपण हे कार्य निश्चित कराल, असा विश्वासही व्यक्त केला.
शासकीय आश्रमशाळा बिजेपार
बिजेपार : शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा बिजेपार येथे शाळेच्या शैक्षणिक नवीन सत्रात विद्यार्थ्यांचे चैतन्यमय वातावरणात स्वागत करण्यात आले.
आश्रमशाळेच्या हॉलमध्ये सरपंच नितू वालदे यांच्या अध्यक्षतेखाली पं.स.दिलीप वाघमारे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, वह्या, पुस्तके व गुलाबाचे फूल देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. त्यांनी गावात प्रभातफेरी काढून शिक्षणविषयक संदेश दिला. मुलांसोबत शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिका प्रभातफेरीत सहभागी झाल्या. त्यानंतर हॉलमध्ये इयत्ता दहावी व बारावीच्या प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. उपस्थित पालक व पाहुण्यासमोर नृत्य, लावणी व गाणी गाऊन वातावरण आणखीच प्रफुल्लीत झाले.
मंचावर प्रमुख पाहुण्यांसह रमेश शहारे, प्राचार्य एस.एम.रामटेके, डॉ.डी.डी.रायपुरे, उज्वला विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.पी.रहांगडाले, अमर तायडे, मेहतर वट्टी, पालक संघाचे अध्यक्ष मीना मडावी होते. विशेष उल्लेखनिय म्हणजे सतत तिसऱ्या वर्षी शाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. या शाळेतील विद्यार्थ्यांनी आदिवासी विभागाद्वारे घेण्यात येणाऱ्या विविध क्रीडा प्रकारामध्ये राज्यस्तरीय पुरस्कार शारीरिक शिक्षक विजय मेश्राम यांच्या मार्गदर्शनात पटकाविले आहे. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आश्रमशाळेचे देवरी कार्यालयाचे शिक्षण विस्तार अधिकारी, कोरोंडे हे पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची पटसंख्या बघण्यासाठी व पालकांनी संवाद साधण्यासाठी प्रतिनिधी म्हणून हजर होते. कार्यक्रमाचे संचालन कमल कापसे यांनी तर आभार प्रा.हट्टेवार यांनी मानले.
पूर्व प्राथमिक शाळा सोनपुरी
दवनीवाडा : सामाजिक न्याय दिवस व राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती तसेच नवागतांचा स्वागत सोहळा पूर्व प्राथमिक शाळा सोनपुरी येथे घेण्यात आला. अध्यक्षस्थानी सरपंच राखी लेखराम ठाकरे होत्या. प्रमुख पाहुणे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन चौरागडे, सेवानिवृत्त श्रीराम ठाकरे, के.यु.ठाकरे, लेखराम ठाकरे, डी.एस.पटले, दिनेश ठाकरे, पोलीस पाटील राजू ठाकरे, तंटामुक्त अध्यक्ष धुवारे व गावातील नागरिक उपस्थित होते. मुख्याध्यापक पी.पटले यांनी शाहू महाराज यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते वर्ग पहिलीमध्ये येणाऱ्या नवागतांचे पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना पुस्तक व ड्रेसचे वाटप करण्यात आले. संचालन व आभार ठाकरे यांनी केले.
जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळा, बोरकन्हार
बोरकन्हार : आमगाव पंचायत समितीअंतर्गत जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा बोरकन्हार येथे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष योगराज राऊत यांच्या अध्यक्षतेखाली नवागतांचे स्वागत करण्यात आले. मुख्य मार्गदर्शक म्हणून आमगाव पंचायत समितीचे वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी डब्ल्यु.एस.घोषे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष रक्षा गौतम, खेलन धमगाये, पुष्पा कवरे, अनिल शहारे, मुख्याध्यापिका प्रभा गायधने आदी मान्यवर उपस्थित होते.
सुरूवातीला इयत्ता पहिलीमध्ये दाखल झालेल्या सर्व नवागंताचे व पालकांचे मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच इयत्ता पाचवीमध्ये दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आले. मुख्य मार्गदर्शक डब्ल्यू.एस.घोष यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संपूर्ण गावात प्रभातफेरी काढून जनजागृती करण्यात आली. बॅडपथकाच्या तालावर, जयघोष करीत विद्यार्थी आनंदी व उत्साही झाले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका प्रभा गायधने, सुनिता टेकुळ, संदीप मेश्राम, पंकज बलगुजर, विजय वालोदे, गीता उईके, विजय मेंढे व शारदा चौधरी आदी शिक्षकवृंदानी परिश्रम घेतले. संचालन संदीप मेश्राम यांनी तर आभार पंकज बलगुजर यांनी मानले.
शहीद अवंती विद्यालय
सालेकसा : शहीद अवंती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोटजमूरा येथे प्रवेशोत्सव कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डी.आर.माहुले होते. याप्रसंगी नवागताचे स्वागत करून त्यांना गोड पदार्थ खाऊ घालण्यात आले. सरपंच बबीता मेश्राम यांच्या हस्ते पुस्तके आणि शालेय साहित्य वाटप करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून मस्करे, पटेल व इतर पालक, शाळेतील कर्मचारी वर्ग व्ही.एम.मानकर, एस.ए.मोहारे, सी.बी.नागपुरे, एच.पी.बंसोड, एम.के.नागपुरे, बी.बी.उके उपस्थित होते.
जि.प. कन्या हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय
परसवाडा : जिल्हा परिषद कन्या हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एन.एस.रहांगडाले, प्रमुख अतिथी प्रा.ए.बी.ढोले, प्रा.आर.वाय.जैतयवार, प्रा.डी.एन.उपराडे, सी.ए.खोब्रागडे, जी.ई.देशमुख, के.पी.वानखेडे, के.व्ही.खोब्रागडे, आर.एन.नाकाडे होते. वर्ग ५ ते ८ च्या सर्व विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तक, टेस्ट बुक वितरण करण्यात आले. कार्यक्रमासाठी सर्व कर्मचारीवृंदांनी सहकार्य केले. संचालन एम.आर.मरकाम तर आभार व्ही.बी.भालाधरे यांनी मानले.

Web Title: Palkheda Rural economist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.