पंचायत विभागाकडून घोळावर शिक्कामोर्तब
By admin | Published: September 4, 2015 01:36 AM2015-09-04T01:36:46+5:302015-09-04T01:36:46+5:30
सडक-अर्जुनी तालुक्यातील पांढरी ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकाऱ्याने आर्थिक घोळ केल्याच्या शंकेवर पंचायत समितीच्या चौकशी अधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब केले आहे.
चौकशीत पूर्ण : ग्रामसेवकाचा कारभार
पांढरी : सडक-अर्जुनी तालुक्यातील पांढरी ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकाऱ्याने आर्थिक घोळ केल्याच्या शंकेवर पंचायत समितीच्या चौकशी अधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
येथे १५ आॅगस्टला सरपंच अनिल मेंढे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा झाली. सदर ग्रामसभेत ग्रामविकास अधिकारी एम.एस. रामटेके यांनी सन २०१४ ते १५ चा वार्षिक हिशेब सादर न केल्यामुळे ग्रामसभा स्थगित करुन ग्रामसेवकांच्या कक्षाला कुलूप लावण्यात आले होते. दि.१९ आॅगस्टला सहा. गटविकास अधिकारी झा.बी.टेंभरे यांच्या मार्गदर्शनात ग्रामपंचायत स्तरावर असलेले रोख पुस्तक वसुली पावती प्रमाणके, ग्रामसभा व मासिकसभा प्रोसिंडींग इत्यादी दस्तावेज तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल तयार करण्यात आला. यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळली.
ग्रा.पं.ने दलित वस्तीची कामे केली. क्रीडांगण बनविण्यात आले. त्या क्रीडांगणावर ८१००० हजार रुपये खर्च दाखविण्यात आला आहे. पर्यावरणावर ग्रा.पं. कार्यालयाला चार लाख रुपयांचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. या खर्चावर मजुराच्या सह्या नाहीत. त्याचप्रमाणे सचिव व चपराशी सुखदेव कोरे यांनी एक लाख ७५ हजार २३५ रुपये करवसुली केली असून बँकेत जमा केल्याचे दिसत नाही.
येथील अधिकाऱ्यांनी जवाबदार व्यक्तींमध्ये अनिल देवाजी मेंढे (सरपंच) ३५१५८५ रुपये थकित, एम.एस. रामटेके (ग्राविअ) ४१९२०३ रुपये थकित, सुखदेव कोरे (कर्मचारी) ६७६१७ रुपये थकित मिळून ८३८४०५ रुपये निघत आहेत.
ग्रामविकास अधिकारी एम.एस. रामटेके यांच्याकडून ग्रामसभा व मासिक सभा प्रोसिडिंग ठेवण्यात आलेली नाही. ग्रामसभा प्रोसिडिंग मध्ये पान क्रमांक १५ ते २० व २३ ते ३१ क्रमांकाची पाने कोरी आहेत. त्यामुळे ग्रामविकास अधिकाऱ्याकडून शासकीय कामात हलगर्जीपणा, रेकॉर्ड अद्यावत न ठेवण्यात दिरंगाई व अनियमितता केल्याचे दिसून येत आहे.
सन २०१४ ते १५ व २०१५ ते १६ च्या रेकॉर्डनुसार पाहणी केली असता ग्रा.पं. आर्थिक व्यवहारात अनियमित करणे, रोख पुस्तक न लिहिने, प्रमाणकाशिवाय खर्च करणे, ग्रामपंचायतची कर वसुली बँक खात्यात न भरणे, स्वत: खर्च करने या कारणास्तव रुपये ८,३८,४०५ रुपयांचा अपहार केल्याचे दिसून येत आहे, असा अभिप्राय चौकशी अधिकाऱ्यांनी दिला.
ग्रामविकास अधिकारी यांच्या कामात हलगर्जीपणा रेकॉर्ड अद्यावत न ठेवने, वरिष्ठांची आदेशाची अवहेलना करणे, रेकॉर्ड तपासणी करीत सादर न करणे याबाबत दोषी असल्यामुळे सरपंच, ग्रामविकास अधिकारी व ग्रा.पं. कर्मचारी अपहारित रकमेत वसुलीस पात्र असल्याचे दिसून येते. प्राथमिक चौकशी सादर केल्याचे पत्र सीईओंना प्राप्त झाले.