पंचायत समितीने मागितले गाळेधारकांना स्पष्टीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:19 AM2021-07-19T04:19:27+5:302021-07-19T04:19:27+5:30
अमरचंद ठवरे बोंडगावदेवी : पंचायत समितीच्या वतीने महिला बचत गट तसेच बेरोजगारांना स्वत:चा रोजगार करण्यासाठी अत्यंत कमी भाडेतत्त्वावर ८ ...
अमरचंद ठवरे
बोंडगावदेवी : पंचायत समितीच्या वतीने महिला बचत गट तसेच बेरोजगारांना स्वत:चा रोजगार करण्यासाठी अत्यंत कमी भाडेतत्त्वावर ८ दुकान गाळ्यांचे वाटप गेल्या ४ वर्षांपूर्वी केले होते. मात्र, मूळ भाडेकरूंनी त्या गाळ्यांचा व्यवसायासाठी वापर केला नाही. ‘एकाच्या नावाने गाळे, दुसऱ्यानेच थाटले दुकान’ असा प्रकार आजघडीला सुरू आहे. ही बाब लक्षात येताच खंड विकास अधिकाऱ्यांनी ६ गाळेधारकांना पत्र देऊन दुकान सुरू असल्याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे.
अर्जुनी मोरगाव पंचायत समितीने स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेमध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणामार्फत उपलब्ध निधीतून पंचायत समिती आवारात गाळ्याचे बांधकाम करून सन २०१७ मध्ये महिला बचत गट तसेच स्वयंरोजगार करणाऱ्यांना अटी व शर्तीच्या अधीन राहून माफक भाडेतत्त्वावर गाळ्यांचे वाटप केले होते. ज्यांच्या नावाने गाळे देण्यात आले त्यांनी स्वत:ची दुकान न थाटता आपले आर्थिक हित जोपासत दामदुपटीने तिसऱ्यालाच दुकान थाटण्याची परवानगी दिल्याचा बिनभोबाट प्रकार बऱ्याच दिवसांपासून सुरू होता.
या नियमबाह्य व दिशाभूल करणाऱ्या प्रकाराची तक्रार एका सुज्ञ नागरिकाने संबंधितांकडे केली होती. त्या अनुषंगानी ९ फेब्रुवारी रोजी पंचायत समितीकडून मोका पंचनामा करण्यात आला. त्यात ज्यांच्या नावाने गाळे वाटप करण्यात आले. त्यांनी स्वत: दुकान न थाटता दुसऱ्याचेच दुकान दिसून येऊनसुद्धा कारवाई करण्यात आली नाही. याबाबत ‘लोकमत’ने २ जुलैच्या अंकात ‘एकाच्या नावाने दुकान गाळे, दुसऱ्यानेच थाटले दुकान’ या शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध करून हा प्रकार उजेडात आणला होता. तेव्हा कुठे पंचायत समितीच्या कुंभकर्णी प्रशासनाला जाग आली व त्यांनी आता गाळेधारकांना स्पष्टीकरण मागितले आहे.
-------------------------
६ गाळेधारकांना मागितले स्पष्टीकरण
या प्रकरणात ९ फेब्रुवारी रोजी झालेल्या मोका पंचनाम्यानंतर अध्यक्ष-सचिव इंदिरा महिला बचत गट (अर्जुनी-मोरगाव), रसिका नीलकंठ ढोरे (इटखेडा), नारायणसिंह विठ्ठलसिंह बघेल (महागाव), अध्यक्ष-सचिव जय गायत्री माता स्वयंसहायता बचत गट (ईटखेडा), दिवाकर विनायक शहारे (अर्जुनी-मोरगाव), अध्यक्ष-सचिव प्रज्ञा स्वयंसहाय्यता महिला बचत गट (अर्जुनी-मोरगाव) या ६ गाळेधारकांना पंचायत समितीच्या वतीने स्पष्टीकरण मागितले आहे. तसेच गाळेधारक बचत गटांनी बचत गट अस्तित्वात असल्याचे प्रमाणपत्र संबंधित यंत्रणेकडून प्राप्त करून घेऊन तसेच गटाचे नोंदणी प्रमाणपत्र, अंकेक्षण अहवाल, व्यवसाय सुरू असल्याबाबतचे प्रमाणपत्र. त्याचप्रमाणे वैयक्तिक गाळेधारकांनी त्यांचा व्यवसाय सुरू असल्याबाबतचे नोंदणी प्रमाणपत्र कार्यालयाचे पत्र मिळताच पंचायत समितीमध्ये जमा करावे, अन्यथा पुढील कार्यवाही करण्याची तंबी देण्यात आली आहे.