बिबट्याच्या वावराने कोकणा परिसरात दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:31 AM2021-09-21T04:31:56+5:302021-09-21T04:31:56+5:30
सडक-अर्जुनी : तालुक्यातील ग्राम कोकणा-टोला परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून बिबट्याने कोंबड्या व बकऱ्यांची शिकार सुरू केली आहे. परिणामी ...
सडक-अर्जुनी : तालुक्यातील ग्राम कोकणा-टोला परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून बिबट्याने कोंबड्या व बकऱ्यांची शिकार सुरू केली आहे. परिणामी कोकणा, खोबा, कोकणा-टोला, कोसमघाट, कोसबी, मनेरी, कनेरी, बकी, मेंडकी, डूग्गीपार, चिखली, परसोडी परिसरातील नागरिक दहशतीखाली वावरत आहेत.
कोकणा-टोला येथे गेल्या ८ दिवसांपासून बिबट्या रोज सायंकाळी ४ पासून गावाशेजारी राहत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. या बिबट्यामुळे आता गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोकणा गावाला लागून असलेले नवेगाव - नागझिरा अभयारण्य फक्त अर्धा किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे नवेगाव - नागझिरा अभयारण्यातील हिंस्त्र प्राणी हे आता गावाकडे शिकारीसाठी येत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, रात्रीच्या वेळी गावातील पथदिवे बंद असल्यामुळे गावात अंधार असतो व लोकांना गावात फिरणे कठीण बनले आहे. तरी संबंधित वन कर्मचाऱ्यांनी लक्ष देऊन त्या बिबट्याचा बंदोबस्त करावा. या बिबट्यामुळे परिसरात कुणाची जीवित हानी होऊ नये, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. बिबट्याने अद्याप कोंबड्या व बकरी खाण्याचा सपाटाच लावला असून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. मात्र अशातच गावकऱ्यांनाही धोका वाढला आहे. बिबट्या गावात येऊ नये, यासाठी गावातील नागरिकांना जीव मुठीत घेऊन संपूर्ण रात्र जागून काढावी लागत आहे. त्यातच सध्या वनपरिक्षेत्र कर्मचाऱ्यांची रात्रीची गस्त होत नसल्याचे चित्र तालुक्यात पाहावयास मिळत आहे. यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची नितांत गरज आहे.
...,.......................................
बिबट्या रोज गावात येत असल्याची माहिती संबंधित वनरक्षकांना दिली आहे. पण कुणी लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे.
- सरपंच
अमर रोकडे
कोकणा /जमी
................................
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या जनावरांचा अत्यल्प मोबदला मिळत असल्यामुळे ते शेतकऱ्यांना परवडणारे नाही. त्यासाठी वन विभागाने जास्त आर्थिक मदत द्यावी. अभयारण्यातील वन्यप्राणी गावाकडे येणार नाहीत, यासाठी वन विभागाने जाळीचे कुंपण लावावे.
प्रकाश झिंगरे
नागरिक
कोकणा-टोला
..................................