मद्य विक्रेत्यांमध्ये दहशत
By admin | Published: March 10, 2017 12:39 AM2017-03-10T00:39:14+5:302017-03-10T00:39:14+5:30
ग्रामपंचायत बनगावच्या हद्दीत मद्य दुकाने बंद करुन गावातच दुसरीकडे जमिनी घेऊन नव्याने दुकाने थाटण्याच्या प्रयत्नात मद्य विक्रेते आहेत.
आमगाव : ग्रामपंचायत बनगावच्या हद्दीत मद्य दुकाने बंद करुन गावातच दुसरीकडे जमिनी घेऊन नव्याने दुकाने थाटण्याच्या प्रयत्नात मद्य विक्रेते आहेत. त्यामुळे त्या विरोधात नागरिकांनी सरपंच व सचिव यांना निवेदन सादर केले आहे.
देशी व विदेशी दारु दुकाने राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग यापासून ५०० मीटर दुरपर्यंत स्थापित असावे, असे न्यायालयीन आदेश आहे. त्यामुळे तालुक्यातील मद्यविक्रेते आपल्या व्यवसायाप्रती गंभीर झाले असून त्यांनी हायवेच्या दुर असलेली जागा विकत घेतल्याची माहिती आहे. आमगाव तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग गोंदिया ते देवरी व राज्य महामार्ग ते आंबेडकर चौक रिसामा, कामठा-रावणवाडी ते सालेकसा रस्ता आहे. सदर रस्त्यावर आठ बार व तीन देशी दारु दुकाने पाचशे मीटरच्या अंतरावर आहेत. त्यामुळे या मद्य विक्रेत्यांना इतरत्र हटविण्याशिवाय पर्याय नाही.
काही मद्य व्यवसायिकांनी जवळच असलेल्या किंडगीपार-कुणबी समाज भवनाजवळ मोठी किंमत मोजून जमीन विकत घेतलेली आहे. पण तेथील रहिवासी व बनगाव येथील व्यसनमुक्त समितीने बनगाव क्षेत्रात मद्यविक्रीला विरोध दर्शवित त्यासंदर्भात निवेदन दिले आहे.
न्यायालयीन निर्णयामुळे रस्त्यावर होत असलेल्या अपघाताला आळा बसणार, असे मत सुज्ज्ञ नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे. मागील सहा महिन्यापूर्वी बनगाव येथील देशी दारु दुकानाविरोधात महिला व युवकांनी आंदोलन केले होते. पण राजकारण पुढे करुन आंदोलनकर्त्यांना मुंग मिळून बसावे लागले होते. या दारुबंदीला १८० महिलांनी उपस्थिती दर्शवून मद्यविक्री संदर्भात रोष व्यक्त केले होते. पण पुढे मद्यविक्री सुरुच राहिल्याने अनेक कुटुंब उध्वस्त झाले. विधवांना मुलांचे पोषण करणे कठीण झाले.