झाशीनगर योजना सुरु होण्यापूर्वीच पंप दुरुस्तीला ?
By admin | Published: June 5, 2017 12:53 AM2017-06-05T00:53:49+5:302017-06-05T00:53:49+5:30
प्रस्तावित झाशीनगर उपसा सिंचन योजनेला तब्बल २१ वर्षे पूर्ण झालीत. योजना अद्याप पूर्णत्वास आली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : प्रस्तावित झाशीनगर उपसा सिंचन योजनेला तब्बल २१ वर्षे पूर्ण झालीत. योजना अद्याप पूर्णत्वास आली नाही. शेतकऱ्यांच्या शेतात एक थेंब सिंचनासाठी पाणी आले नाही. मात्र तत्पुर्वीच १० वर्षापूर्वी खरेदी केलेले योजनेचे पंप दुरुस्तीला आले आहेत. पंपाची चाचणी आता सुरु आहे. मग १० वर्षापूर्वी पंप खरेदीचे औचित्य हे न उलगडणारे आहे. या प्रकरणाची चौकशी करुन संबंधित दोषींवर कारवाईची मागणी केली जात आहे.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील येरंडी/दर्रे गावाजवळ इटियाडोह प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातून झाशीनगर उपसा सिंचन योजना प्रस्तावित आहे. या योजनेचा जब्बारखेडा, येरंडी, पवनी, कोहलगाव, धाबेटेकडी, जांभळी, चुटीया, कान्होली, तिडका, झाशीनगर, येलोडी व रामपूरी या १० गावातील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळणार आहे.
या योजनेला १९९६ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली. १९९६ ते २००२ या कालावधीत प्रकल्पावर अल्प तरतूद असल्याने प्रत्यक्ष कामांना २००२ मध्ये सुरुवात झाली. १९९६ ते २००२ मध्ये अल्प तरतूद असली तरी कामे का झाली नाहीत हे रहस्य आहे. २००२ ते २००८ या कालावधीत वनजमीन मान्यता व प्रत्यक्ष हस्तांतरण न झाल्यामुळे प्रकल्प रेंगाळल्याचे सांगितले जाते. २००८ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. कालवे, अंतर्गत रस्ते, पूल आदी कामांना प्राधान्य न देता साहित्य खरेदीची घाई संबंधित विभागाला झाली. ५०० अश्वशक्तीच्या २ व्हर्टीकल टर्बाईन पंपाची खरेदी करण्यात आली. या पंपाद्वारे १३६२ घमी/सेकंद निसर्गाने पाणी ३४-६४ मी. उंचीवर उपसा करुन सिंचनासाठी वापरण्याचे प्रस्तावित आहे. या योजनेची काम अद्यापही सुरुच आहे. आता त्या पंपाची गरज भासत आहे. २००८ मध्ये खरेदी करुन धूळखात पडले असल्याने त्या पंपांचा वापर करता येणे शक्य नाही. त्यात आणखी काय बिघाड झाला हे अद्याप कळू शकले नाही.
कंत्राटदाराला राजकीय वरदहस्त
जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राजकुमार बडोले यांनी नवेगावबांध फिडरच्या लोकार्पणाचा सूतोवाच केला होता. प्रारंभी हा लोकार्पण सोहळा २० मे रोजी आयोजित करण्यात आला होता. मात्र याला प्रशासनाची संमती नव्हती. त्यानंतर २६ मे चा मुहूर्त निघाला. या कार्यक्रमाला ना.शिवतारे यांची वेळ घेण्यात आली होती. प्रशासनाची कसलीच तयारी झाली नाही मात्र लोकार्पणासाठी पालकमंत्र्यांचा अट्टाहास का? हे कोडेच आहे. झाशीनगर उपसा सिंचन योजनेंतर्गत झालेली कामे सुद्धा अत्यंत निकृष्ठ दर्जाची आहेत. कंत्राटदाराला राजकीय वरदहस्त असल्याने तो अधिकाऱ्यांना जुमानत नसल्याचे अधिकारीच दबक्या आवाजात सांगतात. या योजनेच्या कामाच्या दर्जाची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.
पंपाची जोडणी केली. ते पंप २००६-०७ मध्ये खरेदी केले होते. त्याची आॅईलींग करण्यासाठी नागपूरला पाठविण्यात आले. २ ते ४ दिवसात हे पंप येतील. त्यानंतर त्याची चाचणी घेण्यात येईल.
अरविंद गेडाम
कार्यकारी अभियंता