गराडा येथील पालकांचा आमरण उपोषणाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 10:14 PM2018-01-05T22:14:09+5:302018-01-05T22:14:49+5:30
पंचायत समिती गोरेगाव अंतर्गत येणाऱ्या गराडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला बुधवारी (दि.३) क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिवशीच स्थानिक शिक्षण विभागाने कुलूप लावले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : पंचायत समिती गोरेगाव अंतर्गत येणाऱ्या गराडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला बुधवारी (दि.३) क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिवशीच स्थानिक शिक्षण विभागाने कुलूप लावले. याचा निषेध म्हणून पालक व गावकऱ्यांनी आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला. त्यामुळे शिक्षण विभागाला येथील शाळा बंद करणे चांगलेच महाग पडण्याची शक्यता आहे.
मुरदोली(गराडा) चे सरपंच यांनी शिक्षण विभागाच्या शाळा बंद करण्याच्या निर्णया विरोधात न्यायालयात जाणार असल्याची माहिती आहे. गराडा येथील शाळा बंद झाल्याने दोन दिवसांपासून विद्यार्थी घरीच असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे पालक आणि गावकऱ्यांमध्ये शिक्षण विभागा विरोधात रोष व्याप्त आहे.
शासनाने एकीकडे गाव तिथे शाळा हा मुलमंत्र वापरुन शिक्षणापासून कुणीही वंचीत राहणार असा गाजावाजा करीत आहे. तर दुसरीकडे खेड्यापाड्यातील शाळांना कुलूप ठोकून विद्यार्थ्याना शिक्षणापासून वंचीत ठेवित असल्याचा आरोप सरपंच भगत यांनी केला आहे. गराडा हे गाव जंगलव्याप्त परिसरात वसले असून पूर्व-पश्चिम व उत्तर दिशेत नागझिरा अभयारण्य आहे. त्यामुळे या परिसरात नेहमीच वन्यप्राण्यांचा वावर असतो.
त्यामुळे प्राथमिक शाळा गराडा इतरत्र हलवू नये, असे गावकऱ्यांचे मत आहे. मुंडीपार प्राथमिक शाळा तीन किलोमीटर आहे. त्यामुळे पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी ते सोयीचे नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
शाळेत विविध सुविधा
गराडा येथील प्राथमिक शाळेत स्वच्छतागृह, वीज व पाण्याची सुविधा, डिजीटल शाळा, क्षेत्रफळ सात हजार चौरस मीटर तर पाच हजार चौरस मिटर खेळाचे मैदान, वर्गखोल्या आणि शैक्षणिक साधने उपलब्ध आहेत. वाचनालयात ३०० पुस्तक, शालेय आवारात बगीचा, मुंडीपार केंद्रांतर्गत पहिली १०० टक्के प्रगत शाळा होण्याचा मान या प्राथमिक शाळेला मिळाला आहे. मात्र यानंतरही शिक्षण विभागाने ही शाळा बंद केली.