माता-पिता हेच पहिले गुरू
By Admin | Published: August 1, 2015 02:13 AM2015-08-01T02:13:37+5:302015-08-01T02:13:37+5:30
लोकमत युवा नेक्स्ट व एनएमडी महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने गुरू पौर्णिमेचे औचित्य साधून
गुरूचे महत्त्व : स्पर्धेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
गोंदिया : लोकमत युवा नेक्स्ट व एनएमडी महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने गुरू पौर्णिमेचे औचित्य साधून शुक्रवार (दि.३१) गुरूचे महत्त्व या विषयावर स्पर्धा घेण्यात आली. सदर स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाची सुरूवात सरस्वती मातेच्या छायाचित्राला माल्यार्पण करून झाली. अध्यक्षस्थानी डॉ. चतुर्वेदी तर अतिथी म्हणून डॉ. महाजन, प्रा.डॉ. डोमणे, लोकमत युवा नेक्स्टच्या जिल्हा संयोजिका दिव्या भगत आदी उपस्थित होते.
डॉ. चतुर्वेदी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात गुरूचे योगदान आहे. जसे कुंभार मातीला आकार देवून भांडी बनवतो, तसे गुरू आपल्या शिष्याला घडवितो, असे म्हटले. प्रा. बबन मेश्राम यांनी सांगितले की, आषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजे या तिथीला आपण गुरूपौर्णिमा म्हणून गौरवितो. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरू पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा म्हणतात. गुरू पौर्णिमेला गुरूचे पूजन केले जाते, अशी माहिती सांगितली.
प्रास्ताविकात दिव्या भगत यांनी लोकमत युवा नेक्स्टतर्फे वर्षभर चालणाऱ्या सामाजिक, क्रीडाविषयक व सांस्कृतिक कार्यक्रमाबद्दल युवा वर्गास माहिती दिली. माता-पिता हे आपले घरातील प्रथम गुरू असतात तर शिक्षण व व्यावहारिक ज्ञानासाठी गुरू हा आपला शिक्षक असतो. आयुष्यात कितीही मोठे झालात तरी आपल्या गुरूला कधीही विसरू नये, असे सांगितले.
स्पर्धेत एकूण १८ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. यात सोमेश्वर कटरे, चंद्रशेखर डहारे, भुमेश्वर सोनटक्के, त्रिलोक डहारे, कंचन राठोड, अजय मस्करे, गायत्री भेलावे, निशांत रंगारी, निकिता सविचारे, वैशाली राठोर, रागिणी डहाट, निशा अग्रवाल, नूतन खोब्रागडे, सदीस उके, तेजेश्वरी बसीने, दिपाली ठाकरे, अक्षय कारंजेकर, निशा पटले व इतर विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
संचालन प्रा. बबन मेश्राम यांनी तर आभार नूतन खोब्रागडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी लक्की भोयर, दर्पन वानखेडे, विशू डोंगरे, पारस लोणारे यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)