पालकांनो, स्कूल बसमधून जाणारी मुलं खरंच आहेत का सुरक्षित !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2022 05:00 AM2022-06-26T05:00:00+5:302022-06-26T05:00:01+5:30
अपघाताच्या घटना व तांत्रिक बिघाड टळून विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी स्कूल बसला ‘फिटनेस सर्टिफिकेट’ असणे अत्यंत आवश्यक आहे. गोंदिया शहरातील काही शाळांना सुरूवात झाली आहे. या शाळांमधील सुमारे ४५ टक्के विद्यार्थी स्कूल बस, ३० टक्के विद्यार्थी स्कूल व्हॅन, तर १० टक्के विद्यार्थी हे ऑटो रिक्षांमधून प्रवास करतात. म्हणूनच याची संवेदनशील वाहतूक म्हणून नोंद आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला घेऊन नियमावली आहे.
अंकुश गुंडावार
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : पालकांनो, जरा जागृत व्हा. कारण ज्या स्कूल बसमधून तुमची मुलं शाळेला जातात, ती बस खरोखरच अनुकूल आहे की नाही, हे तपासा. कारण शहर व ग्रामीण भागातील तब्बल ३०० स्कूल बसकडे ‘फिटनेस सर्टिफिकेट’च नाही. ६५ टक्के स्कूल बस मालकांनी फिटनेसचा नियमच धाब्यावर बसवला आहे. त्यामुळे जरा सावध व्हा.
अपघाताच्या घटना व तांत्रिक बिघाड टळून विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी स्कूल बसला ‘फिटनेस सर्टिफिकेट’ असणे अत्यंत आवश्यक आहे. गोंदिया शहरातील काही शाळांना सुरूवात झाली आहे. या शाळांमधील सुमारे ४५ टक्के विद्यार्थी स्कूल बस, ३० टक्के विद्यार्थी स्कूल व्हॅन, तर १० टक्के विद्यार्थी हे ऑटो रिक्षांमधून प्रवास करतात. म्हणूनच याची संवेदनशील वाहतूक म्हणून नोंद आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला घेऊन नियमावली आहे.
कोरोनामुळे संस्थाचालक आर्थिक संकटात
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्ष शाळा बंद होत्या. त्यामुळे खासगी शाळांचे मिळणारे उत्पन्न बंद झाले होते. त्यामुळे अनेक खासगी संस्था शाळा संचालक आर्थिक संकटात आले आहेत. आर्थिक टंचाईमुळेच अनेकांनी अद्याप स्कूल बसेसचे फिटनेस प्रमाणपत्र घेतले नाही. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीची जबाबदारी ही शाळांचीसुद्धा असून, शाळा सुरळीतपणे झाल्यानंतर स्कूल बसेसचे फिटनेस प्रमाणपत्र घेणार असल्याचे काही शाळा संचालकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
स्कूल बस मालक गंभीर केव्हा होणार
यात स्कूल बस व स्कूल व्हॅनच्या रंगापासून ते आसन क्षमता व वेगावरील मर्यादाही आखून दिल्या आहेत. न्यायालयाचा आदेश व परिवहन विभागाच्या निर्देशानुसार शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत (आरटीओ) स्कूल बस व स्कूल व्हॅनची तपासणी दरवर्षी करणे बंधनकारक आहे. उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत फेरतपासणी करण्याबाबत परिवहन विभागाच्या सूचना आहेत. परंतु, स्कूल बसच्या फिटनेसला घेऊन स्कूल बस मालक व स्कूल संचालकही गंभीर नसल्याचे चित्र आहे.
वर्षातून एकदा फिटनेस प्रमाणपत्र बंधनकारक
स्कूल बसना वर्षातून एकदा फिटनेस प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. वाहनाची स्थिती, ब्रेक, लाईट्स, परवाना, चालक गाडी चालविण्यास सक्षम आहे का, वाहन मालक व चालकांवर कोणता गुन्हा नोंद आहे का, वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे कोणती शिक्षा झाली आहे का, शिवाय वाहन व मालकाची कागदपत्रे आदींची तपासणी करण्यात येते. या सर्व बाबी तपासल्यानंतरच आरटीओकडून फिटनेस प्रमाणपत्र देण्यात येते. ते मुदतीच्या आत मिळवणे बंधनकारक असते.
३००वर स्कूल बसेस प्रमाणपत्राविनाच
जिल्ह्यात स्कूल बसची संख्या ४१० आहे. यात सर्वाधिक स्कूल बस गोंदिया शहरातील आहेत. ४१० स्कूल बसेसपैकी ३१० स्कूल बस मालकांनी अद्यापही फिटनेस प्रमाणपत्रच घेतले नसल्याची माहिती आहे.
विनाफिटनेस स्कूल बस रस्त्यावर आढळल्यास कठोर कारवाई
रस्त्यावर वाहन चालविताना आवश्यक कागदपत्रे सोबत बाळगणे आवश्यक आहे. ज्या स्कूल बसमध्ये फिटनेस सर्टिफिकेट नाही, अशा बसेस रस्त्यावर येणे धोकादायक आहे. त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्यावर आता कठोर कारवाई केली जाईल.
- राजवर्धन करपे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, गोंदिया