शिक्षकांच्या मागणीसाठी पालकांची जि.प.वर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 06:00 AM2019-09-18T06:00:00+5:302019-09-18T06:00:31+5:30
शिक्षकांची रिक्त पदे भरण्याकरिता गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती गोरेगाव यांना ३० जुलै २०१९ ला लेखी निवेदन देण्यात आले होते. परंतु गटशिक्षणाधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष करुन शिक्षकांची व्यवस्था केलीच नाही. म्हणून संतप्त पालकांनी जि.प.वर धडक देऊन उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना लेखी निवेदन दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
निंबा : गोरेगाव तालुक्यातील निंबा शाळेतील शिक्षकांची तीन पदे गेल्या वर्षभरापासून रिक्त आहेत. पंचायत समिती आणि शिक्षण विभागाकडे यासंदर्भात वांरवार तक्रारी करुन सुध्दा रिक्त पद भरण्यात आले नाही. त्यामुळे पालकांनी मंगळवारी जि.प.वर धडक देऊन शिक्षकाची नियुक्ती करण्याची मागणी केली.
जिल्हा परिषदेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा दिवसेंदिवस खालावत चालल्याने पटसंख्याही दिवसेंदिवस कमी होत आहे. शिक्षकांची रिक्त पदे अद्यापही भरण्यात आली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता खालावत चालली असून शैक्षणिक नुकसान होत आहे. गोरेगाव तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या निंबा येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक डिजीटल शाळेत ही असेच चित्र आहे. येथे इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असून शिक्षकांची सहा पदे मंजूर आहेत.मात्र मागील एक वर्षापासून शिक्षकांची तीन पदे रिक्त आहेत.परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यासंदर्भात शिक्षण विभागाकडे वारंवार शिक्षकांची रिक्त पदे भरण्याची मागणी करुन निवेदन देण्यात आले. पण त्याचा कसलाही उपयोग झाला नाही.त्यामुळे पालकांमध्ये रोष व्याप्त आहे. संतप्त पालकांनी या विरोधात जि.प.कार्यावर धडक दिली.
निंबा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ११४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या संपूर्ण विद्यार्थ्यांची जवाबदारी केवळ तीन शिक्षकांवर आहे. तर मुख्याध्यापक शिक्षकाचा अर्धा वेळ कागदपत्रे अद्यावत ठेवण्यात निघून जातो. एक शिक्षक अनाधिकृतपणे सुट्या मारतो पंधरा पंधरा दिवस शाळेत गैरहजर असतो. एक शिक्षक बऱ्याचदा डीआयईसीपीडीच्या प्रशिक्षणात पाठविला जातो. त्यामुळे मागील एका वर्षापासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
शिक्षकांची रिक्त पदे भरण्याकरिता गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती गोरेगाव यांना ३० जुलै २०१९ ला लेखी निवेदन देण्यात आले होते. परंतु गटशिक्षणाधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष करुन शिक्षकांची व्यवस्था केलीच नाही. म्हणून संतप्त पालकांनी जि.प.वर धडक देऊन उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना लेखी निवेदन दिले. यावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांनी दोन दिवसात शिक्षकाची नियुक्ती करण्याचे आश्वासन दिले.मात्र यानंतरही शिक्षकाची नियुक्ती न केल्यास जि.प.समोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा पालकांनी दिला आहे.