पालकांनो, पोस्ट कोविडच्या मुलांना जपा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:28 AM2021-08-29T04:28:53+5:302021-08-29T04:28:53+5:30
गोंदिया : दुसऱ्या लाटेत कोरोना होऊन गेलेल्या १५ वर्षांखालील बालकांना कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने पुन्हा काही प्रमाणात लक्षणे दिसून लागली ...
गोंदिया : दुसऱ्या लाटेत कोरोना होऊन गेलेल्या १५ वर्षांखालील बालकांना कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने पुन्हा काही प्रमाणात लक्षणे दिसून लागली असून, काही बालकांना त्राससुद्धा होत आहे. दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात १५ वर्षांखालील ४५ बालकांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. मात्र, सद्य:स्थितीत जिल्ह्यातील पोस्ट कोविड बालकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे पुढे आले नाही. मात्र, जिल्ह्यात सध्या मलेरिया, डेंग्यू, निमोनियाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. यात बालरुग्णांचे प्रमाण अधिक आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ओपीडीमध्ये दररोज ७० ते ८० बालकांची तपासणी केली जात असून, यात दाेन ते तीन बालकांना डेंग्यूची लागण असल्याचे आढळत आहे. त्यामुळे पोस्ट कोविड मुलांना जपण्याची गरज असून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची गरज आहे.
............
१५ वर्षांखालील पॉझिटिव्ह बालकांची संख्या : ००
- सद्य:स्थितीत जिल्ह्यात १५ वर्षांखालील कोरोना पॉझिटिव्ह बालक नाही.
- दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात १५ वर्षांखालील ४५ बालके आढळले होते.
- यातील एकाही बालकाला कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने लक्षणे आढळली नाही.
- व्हायरल फीव्हर सुरू असून त्यादृष्टीने पालकांनी लहान मुलांची काळजी घ्यावी.
- कुठलीही लक्षणे दिसताच वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
................
या लक्षणांकडे लक्ष असून द्या
- जिल्ह्यात सध्या डेंग्यू, मलेरिया आणि न्यूमोनियाची साथ सुरू आहे.
- व्हायरल फीव्हरचे प्रमाण बालकांमध्ये अधिक आहे.
- सर्दी, खोकला, ताप आदी लक्षणे असल्यास किंवा तीन चार दिवसांपेक्षा अधिक दिवस ताप असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.
- ज्या बालकांना कोविड होऊन गेला आहे, त्यांची अधिक काळजी घ्या.
- कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
..................
बालरोगतज्ज्ञ म्हणतात....
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरोग विभागाच्या ओपीडीमध्ये सध्या ७० ते ८० बालकांची तपासणी केली जात आहे. यात डेंग्यू, मलेरिया आणि न्यूमोनियाचे रुग्ण थोड्या प्रमाणात आहेत. मात्र, कोरोनाचा संसर्ग झालेले एकही बालक आढळले नाही. मात्र, पालकांनी काळजी घेण्याची गरज आहे.
- डॉ. सुनील देशमुख, बालरोग तज्ज्ञ.
............................
पहिल्या लाटेइतकीच घ्या काळजी
कोरोना संसर्ग अजूनही पूर्णपणे टळलेला नाही. काही नागरिकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे बंद केले आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटे इतकीच काळजी आता घेण्याची गरज आहे. तसेच बालकांना अधिक जपण्याची गरज आहे.
..............