पालकांनो लहान मुलांना जपा, कोरोनाचा संसर्ग वाढतोय !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:26 AM2021-04-05T04:26:20+5:302021-04-05T04:26:20+5:30
गोंदिया : मार्च महिन्यापासून कोराेनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधितांमध्ये बालकांसह युवकांचे प्रमाण अधिक आहे. मार्च ...
गोंदिया : मार्च महिन्यापासून कोराेनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधितांमध्ये बालकांसह युवकांचे प्रमाण अधिक आहे. मार्च महिन्यात जिल्ह्यात ० ते ६ वयोगटातील ६ आणि ६ ते १८ वयोगटातील ३१४ जणांना कोरोनाची लागण झाली होती, तर एप्रिल महिन्यात ६ ते १० वयोगटातील २० बालके बाधित आहेत, तर ११ ते २० वयोगटातील ९५ बाधितांचा समावेश आहे. त्यामुळेच लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने पालकांनी वेळीच सावध होत काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा बालकांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढून त्यांच्या जिवालासुद्धा धोका निर्माण होऊ शकतो. जिल्ह्यात लहान मुलांपाठोपाठ युवकांमध्येसुद्धा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे युवकांनीसुद्धा कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. जिल्ह्यात मार्च महिन्यात १४६७ बाधितांची नोंद झाली होती, तर एप्रिल महिन्याच्या चार दिवसांत ९४४ बाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गात झपाट्याने वाढ होत असल्याने वेळीच सावध होत याला प्रतिबंध लावण्याची गरज आहे.
........
काय आहेत लक्षणे
- लहान बालकांनासुद्धा कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. लहान बालकांमध्ये प्रामुख्याने सर्दी, खोकला, हगवण, उलटी, ताप, डोकेदुखी आदी लक्षणे दिसून येतात. बालकांमध्ये ही लक्षणे दिसताच पालकांनी डॉक्टरांशी संपर्क साधून वेळीच उपचार करावा.
- लहान मुले मास्क वापरत नाहीत, शिवाय ते घराबाहेरसुद्धा जात नाहीत. घरातील मोठ्या व्यक्तींपासूनच त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे पालकांनीच अधिक काळजी घेण्याची गरज आहे. हात-पाय स्वच्छ धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे, तसेच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे.
.........
काळजी घ्या, घाबरू नका !
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान बालकांना संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले आहे. लहान बालकांना कोरोनाचा संसर्ग हा प्रामुख्याने घरातील मोठ्या व्यक्तींकडूनच होतो. त्यामुळे त्यांनीच अधिक काळजी घेण्याची गरज आहे. लहान बालकांना हगवण, उलटी, ताप, सर्दी होताच वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार करावा.
- डॉ. प्रदीप गुजर, बालरोगतज्ज्ञ
..............
बालकांना कोरोनाचा संसर्ग झाला तरी पालकांनी एकदम घाबरून न जाता वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार घ्यावा, तसेच पालकांनीसुद्धा कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी. स्वत:ला आणि आपल्या लहान बालकांना जपावे.
- संजय दोडके, बालरोगतज्ज्ञ
........
जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित : १७००४
.........
एप्रिल महिन्यात वाढला धोका
१ एप्रिल : ० ते ५ - २, ६ ते १८ : २०,
२ एप्रिल : ० ते ५ - २, ६ ते १८ : ०९,
३ एप्रिल : ० ते ५ - ०, ६ ते १८ : १३,
..........................
० ते ५ वयोगटातील पाॅझिटिव्ह रुग्ण : ७
६ ते १८ वयोगटातील पॉझिटिव्ह रुग्ण : ६५
....................
पाच दिवसांत कोरोनामुक्त झालेल्यांची आकडेवारी
बुधवार : ९२, गुरुवार ५७, शुक्रवार : ५७, शनिवार ४८, रविवार ८८
........................