स्टेट बँकसमोरील पार्किंगमुळे रस्त्यावर होते वाहतुकीची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:32 AM2021-09-05T04:32:46+5:302021-09-05T04:32:46+5:30
आमगाव : शहरातील आमगाव-गोंदिया रस्त्यावर असलेल्या स्टेट बँकेच्यासमोर मुख्य रस्त्यावर करण्यात येत असलेली अनधिकृत पार्किंग शहरवासीयांसाठी डोकेदुखी ठरत ...
आमगाव : शहरातील आमगाव-गोंदिया रस्त्यावर असलेल्या स्टेट बँकेच्यासमोर मुख्य रस्त्यावर करण्यात येत असलेली अनधिकृत पार्किंग शहरवासीयांसाठी डोकेदुखी ठरत आहे. बँकेसमोर रस्त्यावर दुचाकी अस्ताव्यस्त अवस्थेत लावण्यात येत असल्याने रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
आमगाव-गोंदिया हा मुख्य रस्ता असल्याने या रस्त्यावरून दुचाकी, चारचाकी व जड वाहनांची सतत वर्दळ असते. मात्र बँकेसमोर वाहनांची अस्ताव्यस्त गर्दी राहत असल्याने अनेकवेळा वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. बँक प्रशासनाने पार्किंगची व्यवस्था करून वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली काढावा, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. बँकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच दुचाकीची गर्दी असल्याने या गर्दीतून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागते. विशेषतः बँकेत येणाऱ्या पेन्शनर्स, वयोवृद्ध आणि महिलांना याठिकाणी अधिक त्रास सहन करावा लागतो. बँक प्रशासनाने शाखेच्या बाहेर एक गार्ड ठेवल्यास रस्त्यात होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडीची समस्या सोडविली जाऊ शकते. शिवाय, ग्राहकांची वाहने लावण्यासाठी वेगळी पार्किंग व्यवस्था करायला हवी आहे. कारण मुख्य रस्त्यावर होणारी वाहतुकीची कोंडी हा काही एक दिवसाचा प्रश्न नसून रोजचीच बाब झाली आहे. यावर पार्किंगची व्यवस्था होत नाही, तोवर तोडगा निघणार नाही. तोवर किमान वाहन व्यवस्थित लावून तरी समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. मात्र ते सुद्धा होत नसल्याने शहरवासीयांना या त्रासापासून सुटका नाहीच.
.................
वाहतूक पोलिसांचाही कानाडोळा
रस्त्यावर होणारी वाहतुकीची कोंडी, भररस्त्यात अस्ताव्यस्तपणे वाहने लावल्याने नागरिकांना होणारा त्रास याकडे वाहतूक पोलिसांचादेखील कानाडोळा असल्याचे पाहायला मिळतो. शहरात इतरत्र मोहीम राबविणाऱ्या वाहतूक पोलिसांनी या ठिकाणी बेशिस्तपणे वाहने लावणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई केल्यास या ठिकाणची वाहतूक कोंडीची समस्या निश्चितपणे निकाली निघू शकते, अशी अपेक्षा शहरातील नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.