बिरसी विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवेचा 'टेक ऑफ' पुन्हा केव्हा?
By अंकुश गुंडावार | Published: November 19, 2022 03:33 PM2022-11-19T15:33:02+5:302022-11-19T15:33:33+5:30
करार संपण्यापूर्वीच कंपनीने गुंडाळला गाशा; सहा महिन्यांतच सेवा पडली ठप्प
गोंदिया : तालुक्यातील बिरसी विमानतळावरून जवळपास सात-आठ वर्षांच्या कालावधीनंतर यंदा १३ मार्चपासून प्रवासी विमान वाहतूक सेवेला प्रारंभ करण्यात आला. सहा महिने सुरळीत सेवा दिल्यानंतर फ्लाय बिग कंपनीने देखभाल दुरुस्तीच्या नावावर ९ ऑगस्टपासून सेवा बंद केली. यानंतर सेवा परत सुरू करण्याऐवजी कंपनीने गाशा गुंडाळला. त्यामुळे ही सेवा जिल्हावासीयांसाठी केवळ औटघटकेचीच ठरली असून, पुन्हा प्रवासी विमान वाहतूक 'सेवेचा टेक ऑफ केव्हा होणार, असा प्रश्न जिल्हावासीयांकडून केला जात आहे.
बिरसी येथे तत्कालीन विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या पुढाकाराने आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ उभारण्यात आले. याठिकाणी पायलट प्रशिक्षण केंद्रदेखील असून, ते सुरळीतपणे सुरू आहे. या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवेला मात्र प्रारंभ झाला नव्हता. यानंतर खा. सुनील मेंढे यांनी मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा करून केंद्र शासनाच्या उड्डाण योजनेंतर्गत ही सेवा सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला. त्याला यशदेखील आले. नोएडा येथील फ्लाय बिग कंपनीने प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू करण्याचे कंत्राट घेतले.
१३ मार्चपासून गोंदिया-इंदूर- हैदराबाद या मार्गावर विमान सेवा प्रारंभ करण्यात आली. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. त्यानंतर या विमानतळावरून मुंबई, पुणे, गोवा, कोलकाता या मार्गावरसुद्धा प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू करण्यात यावी, यासाठी आग्रह केला जात होता; पण प्लाय बिग कंपनीने करार संपण्यापूर्वीच ९ ऑगस्टपासून प्रवासी विमान वाहतूक सेवा येथून बंद केली. त्यामुळे जिल्हावासीयांच्या आशेवर पाणी फेरले गेले.
करार ऑक्टोबरपर्यंतचा, सेवा बंद ऑगस्टमध्ये
कंपनीने पहिल्या टप्प्यात ऑक्टोबरपर्यंत सेवा देण्याचा करार केला; पण ९ ऑगस्टला विमानाच्या देखभाल दुरुस्तीच्या नावावर काही दिवस विमानसेवा बंद राहणार असल्याचे सांगितले. मात्र, त्यानंतर सेवा पूर्ववत न करता कंपनीचे कार्यालय बंद करीत या विमानतळावरील सेवा कायमस्वरुपी बंद करीत गाशा गुंडाळला. त्यामुळे ही सेवा जिल्हावासीयांसाठी औटघटकेची ठरली.
कार्गो सेवा सुरु करण्याला वाव
बिरसी विमानतळावरून कार्गो सेवा सुरू करण्याला वाव आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्याची लागून असलेली सीमा आणि हावडा-मुंबई रेल्वे मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानक हे महत्त्वपूर्ण स्थानक आहे. त्यामुळे प्रवासी वाहतूक सेवेसह कार्गो सेवा सुरू करण्याससुद्धा चांगला वाव आहे. मात्र, यासाठी आता प्रबळ राजकीय इच्छाशक्ती आणि पाठपुराव्याची गरज आहे.
बिरसी विमानतळ प्राधिकरणाचे असहकार्य
विमानतळ प्राधिकरणाने नाईट लँडिंगसाठी आवश्यक असलेली येथील एएलएस (ऑटोमॅटिक लँडिंग सिस्टीम) ही यंत्रणा कोरोनाकाळात काढून कोलकाता येथे हलविली. त्यातच विमानतळावर लँडिंग करण्यासाठी कंपनीने अनेकदा हवामानाचे कारण पुढे करीत विमान लँड करू दिले नसल्याचा आरोप आहे. मात्र, दुसरीकडे पायलट प्रशिक्षण विमानांना उतरण्याची सेवा मात्र सुरळीतपणे सुरु आहे. विमानतळ प्राधिकरणाकडून सहकार्य मिळत नसल्याने सेवा बंद केल्याचे फ्लाय बिगच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.