एक्स्प्रेसमुळे पॅसेंजर चार तास उशिरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 09:48 PM2019-04-21T21:48:40+5:302019-04-21T21:48:58+5:30
चांदाफोर्ट-गोंदिया ही प्रवासी रेल्वे रोज धावते. पण शनिवारी (दि.२०) सायंकाळी एक्स्प्रेसमुळे ६८८०१ क्रमांकाची ही गाडी तब्बल चार तास उशिरा आली. यामुळे दररोज प्रवास करणारे नागरिक, अनेक विभागाचे कर्मचारी, शालेय विद्यार्थी, व्यावसायिक प्रशिक्षण करणारे प्रशिक्षणार्थी तसेच मजुरांची चांगलीच अडचण झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बाराभाटी : चांदाफोर्ट-गोंदिया ही प्रवासी रेल्वे रोज धावते. पण शनिवारी (दि.२०) सायंकाळी एक्स्प्रेसमुळे ६८८०१ क्रमांकाची ही गाडी तब्बल चार तास उशिरा आली. यामुळे दररोज प्रवास करणारे नागरिक, अनेक विभागाचे कर्मचारी, शालेय विद्यार्थी, व्यावसायिक प्रशिक्षण करणारे प्रशिक्षणार्थी तसेच मजुरांची चांगलीच अडचण झाली.
चंद्रपूर मार्गावर दररोज ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. चांदाफोर्ट-गोंदिया ही पॅसेंजर सुविधाजनक ठरत असल्याने नागरिक याच गाडीने आपल्या कामानिमित्त ये-जा करतात. मात्र शनिवारी (दि.२०) वैनगंगा सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि सुरक्षा जवानांची विशेष गाडी धावल्याने या पॅसेंजर गाडीला चार तास उशिरा
धावावे लागले. बाराभाटीत या गाडीची येण्याची वेळ सायंकाळी ५.४६ वाजता असताना शनिवारी ही गाडी रात्री ९.४९ वाजता आली. या रेल्वे स्थानकावरून तेंदूपत्ता संकलन व बोद भराईच्या कामासाठी जात असलेल्या मजुरांसह अन्य प्रवाशांना चांगलाच त्रास सहन करावा लागला.
या रेल्वे मार्गावर अनेक अडचणी नागरिकांना सोसाव्या लागतात. बºयाच वेळा इंजन फेल होतात, अनेक वेळा रुळ तुटले, अनेक स्थानकांवर पुरेशा सोयी नाहीत, बसायची व्यवस्था नाही.
या मार्गावरुन अनेक मार्गासाठी गाड्या धावतात. एक्स्प्रेससाठी नेहमीच पॅसेंजर गाडीला थांबवून ठेवले जाते. आपले काम आटोपून घरची वाट धरणाºया नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागतो.
गाडीचे डबे वाढवा
उन्हाळ्यात लग्नसराई असते यामुळे लग्नाची खरेदी करायला नागरिकांची ये-जा सुरू आहे. याशिवाय आपापल्या कामानिमित्त सर्वांनाच या गाडीने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे गाड्या भरभरून वाहत आहे. मात्र या मार्गावरील गाड्यांना मोजकेच डबे आहेत. त्याचप्रमाणे ७८००२ या मेमोला तर फारच गर्दी बघावयास मिळत आहे. सदर मेमो सकाळी गोंदियावरुन १०.२० ला सुटत असून तिला फक्त पाच डबे असतात. मात्र प्रवाशांची गर्दी बघता गाडीला सुमारे १० डबे असणे आवश्यक आहे. तसेच सकाळच्या गोंदिया-चांदा फोर्ट गाडीतही नेहमीच गर्दी असते. यामुळे या मार्गावरील गाड्यांचे डबे वाढविण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.
थांब्याची वेळ वाढवा
चांदाफोर्ट-गोंदिया मार्गावरील गाड्यांत खूप गर्दी आहे. अशावेळी लहान स्थानकावर रेल्वेपासून तीन फूट स्थानकाची जागा असते. अशा प्रकारामुळे व गर्दीमुळे म्हाताºया व बालकांना चढायला-उतरायला फारसे जमत नाही व प्रवासी पडतात. यात कित्येक जखमी होतात तर काहींचा जीवही जातो. करिता गाड्यांच्या थांब्याची वेळ वाढविण्याची मागणी येरंडी, बाराभाटी, कुंभीटोला, सुकडी, बोळदे, ब्राह्मणटोला आदी गावकºयांनी केली आहे.