प्रवासी विमानांनी येऊ शकते बिरसी विमानतळ नफ्यात
By admin | Published: January 25, 2017 01:33 AM2017-01-25T01:33:51+5:302017-01-25T01:33:51+5:30
गोंदियाजवळील बिरसी विमानतळ प्रवासी विमानसेवेसाठी सज्ज आहे. अगदी २४ तासाच्या पूर्वसुचनेवरून आम्ही ही सेवा सुरू करू शकतो.
वर्षाला ९ कोटींचा तोटा : विमानसेवेसाठी राजकीय दबावाची गरज
गोंदिया : गोंदियाजवळील बिरसी विमानतळ प्रवासी विमानसेवेसाठी सज्ज आहे. अगदी २४ तासाच्या पूर्वसुचनेवरून आम्ही ही सेवा सुरू करू शकतो. प्रवासी विमानसेवा सुरू केल्यानंतरच हे विमानतळ नफ्यात येणार आहे. त्यासाठी राजकीय नेत्यांनी जोर लावणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा बिरसी विमानतळाचे संचालक सुभाष प्रजापती यांनी व्यक्त केली.
बिरसी विमानतळावर कोणतेही मोठे व्यावसायिक विमान उतरू शकेल अशी व्यवस्था आहे. तब्बल ३२०० मीटरची धावपट्टी आहे. नाईट लँडींगसह खराब हवामानातही विमान उतरू शकेल अशी व्यवस्था आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रवासी विमानसेवा सुरू करणे गरजेचे झाले आहे.
प्रजापती यांनी ते गोंदियात आल्यापासून विमानतळाच्या विकासासाठी गेल्या दोन वर्षात केलेल्या कामांची माहिती पत्रपरिषदेत दिली. विशेषत: येथील प्रकल्पग्रस्त आणि सिक्युरिटी गार्डचा प्रश्न काही दिवसांपासून ऐरणीवर आला आहे. त्याबद्दल माहिती देताना त्यांनी सांगितले की, या ठिकाणी एकूण ६५ सुरक्षा रक्षक आहेत. त्यापैकी विमानतळासाठी ४९ तर फाईंग अकादमीसाठी १६ गार्ड लागलेले आहेत. हे दोन्ही ठिकाणचे गार्ड आतापर्यंत दोन एजन्सीमार्फत ठेवले होते. नियमानुसार ९० टक्के गार्ड हे सरकारी सेवेतील माजिी कर्मचारी असणे गरजेचे आहे. मात्र आतापर्यंत जे गार्ड येथे कार्यरत होते त्यात स्थानिक आणि अप्रशिक्षित गार्ड आहेत. त्यामुळे मी यासंदर्भात वरिष्ठांकडे माहिती दिली. त्यानुसार काही दिवसांपूर्वीच दिल्ली येथून नव्याने झालेल्या निविदा प्रक्रियेनुसार गार्ड नियुक्त करण्याचा कंत्राट नवीन एजन्सीला देण्यात आला आहे. ही एजन्सी १ फेब्रुवारीपासून नवीन गार्ड नियुक्त करणार आहे. हे सर्व नियमानुसार होत असताना काही लोक जुन्याच गार्डला घेण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे प्रजापती म्हणाले प्रकल्पग्रस्तांपैकी ज्या ३० लोकांनी कमी मोबदला मिळाल्याचे सांगत न्यायालयात प्रकरण दाखल केले होते त्यांना न्यायालयाच्या आदेशानुसार मोबदला दिला जाणार आहे. या प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्याची कोणतीही हमी आमच्या करारपत्रात नाही, असेही प्रतापती यांनी स्पष्ट केले. (जिल्हा प्रतिनिधी)
नाना पटोले विमानसेवेसाठी प्रयत्नशील
बिरसी विमानतळावरील सोयी आणि प्रवासी विमानसेवा सुरू करण्याबद्दल अधिकाऱ्यांनी खासदार नाना पटोले यांच्याशी चर्चा केली. त्यांनी विमानसेवा सुरू करण्याबद्दल सकारात्मकता दाखवून त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे राज्यातील ज्या १० शहरांचा विमानसेवेसाठी राज्य सरकार विचार करत आहे त्यात गोंदिया आहे. त्यामुळे लवकर ही सेवा सुरू करण्याची मागणी केली जात आहे.