गोंदिया-जबलपूर ब्रॉडगेजवर धावणार पॅसेंजर
By admin | Published: August 10, 2016 12:03 AM2016-08-10T00:03:24+5:302016-08-10T00:03:24+5:30
नव्याने विकसित केलेल्या मध्यप्रदेशातील जबलपूर ब्रॉडगेज मार्गावर पॅसेंजर गाडी सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.
१५ आॅगस्टचा मुहूर्त ? : विभागीय व्यवस्थापकांनी घेतली इंजिन ट्रायल
गोंदिया : नव्याने विकसित केलेल्या मध्यप्रदेशातील जबलपूर ब्रॉडगेज मार्गावर पॅसेंजर गाडी सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. गोंदिया-जबलपूर ब्रॉडगेज अंतर्गत जबलपूर ते सुकरीमंगेला दरम्यान येत्या स्वातंत्रदिनापासून म्हणजे १५ आॅगस्टपासून गोंदिया-जबलपूर पॅसेंजर ट्रेन सुरू करण्यासाठी दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे प्रशासनाने चाचण्या सुरू केल्या आहे.
सदर ब्रॉडगेजच्या ट्रॅकवरून पहिल्यांना इंजिनचे ट्रायल घेण्यासाठी नागपूर मंडळाचे व्यवस्थापक अमितकुमार अग्रवाल आपल्या चमूसह पोहोचले होते. कछपुरावरून रवाना झाल्यावर १० मिनिटांनंतर इंजिन गढा स्थानकावर पोहोचले. तेथे निरीक्षणादरम्यान प्लॅटफार्मसह शेडचे अपूर्ण बांधकाम व चिखलयुक्त स्थिती पाहून ते स्थानिक व्यवस्थापनावर नाराज झाले. त्यांनी सर्व अपूर्ण कामांचे छायाचित्र घेतले. त्यानंतर त्यांनी ग्वारीघाट, जमतरा, चारघाट पिपरिया व बरगी येथेसुद्धा इंजिन थांबवून निरीक्षण केले. (प्रतिनिधी)
ट्रेनसाठी लागणार सुरक्षा आयुक्तांची एनओअी
मंडळ रेल्वे व्यवस्थापक अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार, जबलपूर ते सुकरीमंगेलादरम्यान १५ आॅगस्ट रोजी पॅसेंजर ट्रेन चालविण्याचा विचार सुरू आहे. परंतु सर्व कामसुद्धा पूर्ण करावयाचे आहे. मुख्य सुरक्षा आयुक्तांद्वारे ट्रायल घेतल्यानंतर त्यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच सदर ट्रेन सुरू करणे शक्य होणार आहे.
अशी होती इंजिनची गती
ट्रायल इंजिन कछपुरा ते ग्वारीघाटपर्यंत ५५ किमी प्रतितास, ग्वारीघाट ते बरगीपर्यंत ५० व बरगी ते सुकरीपर्यंत २० किमी प्रतितासाच्या गतीने चालविण्यात आले. ग्वारीघाट येथील अपूर्ण कार्यामुळे डीआरएम नाराज झाले व १५ आॅगस्टपूर्वी कोणत्याही स्थितीत काम पूर्ण करण्याचे तेथील व्यवस्थापनाला निर्देश दिले. आत झोन प्रशासन कोणत्याही स्थितीत १५ आॅगस्टचे उद्दिष्ट समोर ठेवून सुकरीमंगेलापर्यंत प्रवासी गाडी चालविण्याच्या तयारीत गुंतले आहे.