पॅसेंजर रेल्वे अद्यापही लॉक का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:34 AM2021-08-18T04:34:22+5:302021-08-18T04:34:22+5:30
गोंदिया : कोरोना संसर्गामुळे मागील दीड वर्षांपासून रेल्वेने पॅसेंजर आणि लोकल गाड्या बंद केल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्याने ...
गोंदिया : कोरोना संसर्गामुळे मागील दीड वर्षांपासून रेल्वेने पॅसेंजर आणि लोकल गाड्या बंद केल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्याने शासनाने सर्वच निर्बंध शिथिल केले आहे. सर्वच व्यवहार सुरळीत झाले आहेत. रेल्वे विभागाने विशेष व काही एक्स्प्रेस गाड्या सुरू केल्या आहेत. पण पॅसेंजर आणि लोकल गाड्या अजूनही सुरू केल्या नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना याचा भुर्दंड बसत आहे. एकीकडे विशेष गाड्यांची संख्या वाढवित असताना दुसरीकडे मात्र पॅसेंजर आणि लोकल गाड्या सुरू करण्यासाठी अद्याप कुठलीही पावले उचलली नाहीत. त्यामुळे पॅसेंजर आणि लोकल गाड्या सुरू केल्याने कोरोना वाढतो का? असा सवाल आता प्रवासी करीत आहेत. पॅसेंजर आणि लोकल गाड्या सुरू करण्यासाठी अद्याप रेल्वे बोर्डाकडून ग्रीन सिग्नल मिळाला नसल्याची माहिती आहे.
.......
रेल्वे बाेर्डाच्या सिग्नलची प्रतीक्षा
कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असला तरी रेल्वे बाेर्डाकडून अद्याप बंद असलेल्या लोकल आणि पॅसेंजर गाड्या सुरू करण्यासंदर्भात अद्याप कुठलेही निर्देश प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे या गाड्या केव्हा सुरू होतील, हे अद्याप निश्चित सांगता येणार आहे.
- एन. आर. पती, स्टेशन मास्तर
.......
बंद असलेल्या पॅसेंजर गाड्या
मागील दीड वर्षांपासून गोंदिया - बल्लारशा चांदाफोर्ट, गोंदिया - बालाघाट, गोंदिया - कटंगी, गोंदिया - नागपूर, गोंदिया - दुर्ग, गोंदिया - बरौनी, गोंदिया - रायपूर, गोंदिया - बिलासपूर, गोंदिया - जबलपूर, गोंदिया-इतवारी या पॅसेंजर आणि लोकल गाड्या अद्याप सुरू झाल्या नाहीत.
..........
सुरू असलेल्या एक्स्प्रेस गाड्या
नागपूर - रायपूर इंटरसिटी एक्स्प्रेस, गोंदिया - मुंबई विदर्भ एक्स्प्रेस, गोंदिया - कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस, छत्तीसगड - अमृतसर एक्स्प्रेस, पुणे - हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस, जबलपूर - चांदफाेर्ट, समता एक्स्प्रेस, अजमेर - पुरी एक्स्प्रेस, हावडा - मुंबई यांसह इतर एक्स्प्रेस गाड्या सुरू आहेत.
........
सर्वच एक्स्प्रेस गाड्या रुळावर
रेल्वे विभागाने काही एक्स्प्रेस गाड्यांना विशेष गाड्यांचा दर्जा दिला. यामुळे तिकिटाचे दर दुप्पट झाले आहेत. मागील महिन्यापासून सर्वच एक्स्प्रेस गाड्या सुरू केल्या आहेत. त्यामुळे सर्वच एक्स्प्रेस गाड्या रुळावर आल्याचे चित्र आहे.
........
रेल्वेचा स्पेशल परवडेना .....
मागील दीड वर्षांपासून लोकल आणि एक्स्प्रेस गाड्या बंद असल्याने मला गोंदिया ते अर्जुनी मोरगाव हा बसने करावा लागत आहे. यात वेळ आणि पैशाचासुध्दा भुर्दंड बसतोय आहे. त्यामुळे रेल्वेने विशेष गाड्यांप्रमाणेच आता एक्स्प्रेस आणि लोकल गाड्या सुरू करण्याची गरज आहे.
- संतोष उमक, प्रवासी
.......
रेल्वे विभागाने कोरोनाच्या नावावर विशेष गाड्यांची संख्या वाढविली. मात्र, पॅसेंजर आणि लोकल गाड्या सुरू करण्यासंदर्भात अद्याप कुठलीच पावले उचलली नाहीत. त्यामुळे या गाड्या सुरू केल्यानेच कोरोना होतोय काय, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
- राहुल पारखी, प्रवासी,