रेल्वे ट्रॅकवर प्रवाशांचा संताप, गोंदिया रेल्वे स्थानकावर तणावाचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 08:21 PM2023-01-04T20:21:49+5:302023-01-04T20:21:59+5:30
रेल्वे विभागाने प्रवासी गाड्यांना थांबवून आधी मालगाड्या सोडण्याचे धोरण अवलंबिले आहे.
गोंदिया : मागील तीन चार महिन्यांपासून प्रवासी गाड्यांचे वेळापत्रक पुर्णपणे बिघडले असून याचा फटका प्रवाशांना सहन करावा लागत आहे. रेल्वे विभागाच्या मालगाड्या फस्टच्या धोरणामुळे प्रवासी गाड्या पाच ते सहा तास उशीराने धावत आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या रेल्वे प्रवाशांनी बुधवारी (दि.४) सायंकाळच्या ७.३० वाजताच्या सुमारास गोंदिया रेल्वे स्थानकावर मालगाडी येताच रेल्वे ट्रॅकवर उतरुन रेल्वे प्रशासनाच्या धोरणाचा संताप व्यक्त केला. यामुळे रेल्वे स्थानकावर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
रेल्वे विभागाने प्रवासी गाड्यांना थांबवून आधी मालगाड्या सोडण्याचे धोरण अवलंबिले आहे. यामुळे हावडा-मुंबई मार्गावरील सर्वच प्रवासी गाड्या विलंबनाने धावत आहे. गोंदिया ते नागपूर या दोन तासांच्या प्रवासाठी तब्बल सहा तास लागत असल्याने प्रवाशांना त्यांच्या नियोजित ठिकाणी पाेहचण्यास विलंब होत आहे. अनेकांना नागपूर रेल्वे स्थानकावरुन पोहचून तेथून पुढची गाडी पकडून पुढे जाणे शक्य होत नाही. तर दररोज अपडाऊन करणाऱ्या प्रवाशांना सुध्दा याची झळ बसत आहे.
हा प्रकार सातत्याने सुरु असून यासंदर्भात रेल्वे विभागाला निवेदन देवून सुध्दा यात कुठलीच सुधारणा झाली नाही. त्यामुळे बुधवारी सायंकाळच्या सुमारास शालीमार ओखा ही गाडी थांबवून मालगाडी सोडण्यात आली. याप्रकारामुळे संतप्त झालेल्या रेल्वे प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवर उतरुन आपल्या संतापाला वाट मोकळी करुन दिली. तर काहींनी मालगाडी दगडफेक केल्याची चर्चा आहे. दरम्यान या प्रकारामुळे गोंदिया रेल्वे स्थानकावर काही काळ तणावपुर्ण स्थिती निर्माण झाली होती. दरम्यान रेल्वे सुरक्षाबल आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करीत प्रवाशांची समजूत काढल्यानंतर प्रवासी शांत झाले.
मालगाड्या फस्टचे धोरण बदला
रेल्वे विभागाने मालगाड्या फस्टचे धोरण अवलंबिले असून यामुळे प्रवासी गाड्यांना विलंब होत आहे. याची झळ प्रवाशांना बसत आहे. त्यामुळे रेल्वे विभागाने हे धोरण त्वरित बदलविण्याची मागणी प्रवाशांनी यावेळी रेल्वे विभागाकडे केली.