शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप

By अंकुश गुंडावार | Published: May 28, 2024 07:16 PM2024-05-28T19:16:09+5:302024-05-28T19:16:37+5:30

गोंदिया रेल्वेस्थानकावर दीड तास गोंधळ : पाच कोचमधील एसी बंद, रेल्वे विभागावर रोष

Passengers angry over closed AC in Shalimar-Mumbai LTT Express | शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप

शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप

गोंदिया : शालिमार- मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील (कुर्ला) पाच कोचमधील एसी बंद असल्याने प्रवाशांनी मंगळवारी (दि.२८) दुपारी ३:२५ वाजता गोंदिया रेल्वेस्थानकावर गाडी पोहोचल्यानंतर चांगलाच संताप व्यक्त केला. जोपर्यंत गाडीतील एसी सुरू होणार नाहीत, तोपर्यंत गाडी पुढे जाऊ देणार नाही, अशी भूमिका प्रवाशांनी घेतली होती. यामुळे गोंदिया रेल्वेस्थानकावर जवळपास दीड तास प्रवासी आणि रेल्वे अधिकारी यांच्यात वाद सुरू होता. दरम्यान, पुढील स्थानकावर एसी दुरुस्ती करून सुरू करण्याचे ठोस आश्वासन दिल्यानंतर सायंकाळी ४:४८ वाजता ही गाडी नागपूरकडे रवाना झाली.

प्राप्त माहितीनुसार शालिमार- मुंबई एलटीटी एक्स्प्रेस ही शालिमार रेल्वेस्थानकावरून सुटल्यानंतर या गाडीच्या १ कोचमधील एसी खडगपूरजवळ बंद झाला. याची तक्रार प्रवाशांनी टीसी व रेल्वेच्या ॲपवर ऑनलाइन नोंदविली; पण यानंतरही याची दखल घेण्यात आली नाही, तर रायपूर रेल्वेस्थानकावर ही गाडी येईपर्यंत पुन्हा दोन कोचमधील एसी बंद झाले. त्यामुळे प्रवाशांचा संताप वाढला. आधीच उन्हाळ्याचे दिवस असल्याने उकाड्याने नागरिक त्रस्त आहेत. त्यातच कोचमधील एसी बंद पडल्याने प्रवाशांसह लहान मुलांचे हाल झाले. त्यामुळे प्रवाशांनी यावर संताप व्यक्त केला. 

तेव्हा गाडीतील टीसी आणि तंत्रज्ञ कर्मचाऱ्यांनी पुढील स्थानक येईपर्यंत एसी सुरू होतील, असे सांगितले. मात्र, गोंदिया रेल्वेस्थानकावर ही गाडी येईपर्यंत पाच कोचमधील एसी बंद पडले. त्यामुळे सर्व एसी कोचमधीलमधील प्रवाशांनी गोंदिया रेल्वेस्थानकावर खाली उतरत गोंधळ घातला. स्टेशन व्यवस्थापकांच्या कार्यालयासमोर एकत्र होत जोपर्यंत गाडीतील एसी सुरू होत नाहीत तोपर्यंत गाडी पुढे जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे गोंदिया रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक ३ वर ही गाडी जवळपास दीड तास उभी राहिली. 

दरम्यान, गोंदिया रेल्वेस्थानकावर टेक्नेशियनला या गाडीत पाठवून नागपूर रेल्वेस्थानक येईपर्यंत एसी सुरू करण्याची ग्वाही स्टेशन व्यवस्थापकांनी प्रवाशांना दिली. त्यानंतर प्रवाशांनी माघार घेतली. यानंतर सायंकाळी ४:४८ वाजता ही गाडी नागपूरकडे रवाना झाली. या प्रकारामुळे गोंदिया रेल्वेस्थानकावर काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

दुसऱ्या गाड्यांना विलंब
गोंदिया रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक ३ वर शालिमार- मुंबई एलटीटी एक्स्प्रेस (कुर्ला)मधील प्रवाशांनी बंद एसीवरून दीड तास ही गाडी रोखून धरली. त्यामुळे या फलाटवर येणाऱ्या तीन- चार गाड्या १ तास विलंबाने धावल्या, तर काही गाड्या फलाट क्रमांक १ व २ वर वळविण्यात आल्या होत्या. गाड्यांना पोहोचण्यास विलंब झाल्याने अनेक प्रवाशांना त्यांच्या नियोजित ठिकाणी पोहोचण्याची अडचण झाली.

गाड्यांचा लेटलतीफपणा कायम
हावडा- मुंबई मार्गावरील अनेक गाड्या अजूनही दोन ते तीन तास उशिराने धावत आहेत. मागील दीड महिन्यापासून ही समस्या कायम असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे; पण रेल्वे प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.

Web Title: Passengers angry over closed AC in Shalimar-Mumbai LTT Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे