बसस्थानक स्थानांतरित झाल्याने प्रवाशांची तारांबळ
By admin | Published: August 23, 2014 01:56 AM2014-08-23T01:56:32+5:302014-08-23T01:56:32+5:30
सडक/अर्जुनी येथील शेंडा फाटा चौकातील बस स्थानक हा जुन्या ठिकाणच्या शिवमंदिराजवळ गेल्यामुळे आता प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे.
सडक/अर्जुनी : सडक/अर्जुनी येथील शेंडा फाटा चौकातील बस स्थानक हा जुन्या ठिकाणच्या शिवमंदिराजवळ गेल्यामुळे आता प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे.
शेडा फाटा चौकातील बस स्थानकामुळे गोंदिया, गोरेगाव, डव्वा, साकोली, भंडारा, देवरी, नागपूर, अर्जुनी/मोरगाव, नवेगावबांधवरून ये-जा करणाऱ्या सडक/अर्जुनी येथील कर्मचाऱ्यांना फारच त्रास होणार आहे.
तहसील कार्यालय, पंचायत समिती, भूमी अभिलेख, सार्वजनिक बांधकाम विभाग, वीज महामंडळ, बँक, जिल्हा परिषदेच्या शाळा, पोस्ट आॅफिस, वन विभाग व काही खासगी शाळांतील कर्मचारी अप-डाऊन करतात. त्यामुळे त्यांच्या ये-जा करण्यात मोठीच समस्या निर्माण होणार आहे. या त्रासामुळे काही अधिकाऱ्यांनी रोज सकाळी १० वाजता आपल्या चपराशांना मुख्य बस स्थानकावर दुचाकी घेवून रहा व अधिकाऱ्यांना ने-आण करा, असे बजावल्याचेच दिसत आहे.
शेंडा फाटा चौकातील बस स्थानक मुख्य बस स्थानकाकडे गेल्याने आता शेंडा फाटा चौकातील अपघाताची संख्या कमी झाली आहे. तसेच ते चौक वर्दळीचे ठिकाण असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी त्रास होत होते. शनिवारी बाजाराच्या दिवशी तर बाजार करणाऱ्यांना व ये-जा करणाऱ्या प्रवाशांना पाय ठेवायलाही जागा राहत नव्हती.
याच चौकात इतर व्यायसायिकांनी आपले ठेले रस्त्यावर लावल्याने वाहन धारकांना डांबरी रस्त्यावरच वाहने ठेवावे लागत होते व प्रवाशांना उतरावे लागत होते. अशा वर्दळीच्या ठिकाणी नेहमी अपघाताची शक्यता राहत होती.
१६ आॅगस्टपासून सर्व बसेस शिव मंदिराजवळील मुख्य बस स्थानकावर थांबतात. त्यामुळे स्टेट बँक, वन विभाग व एकात्मिक बाल कल्याण विभागाकडे जाण्यासाठी एक किमीपर्यंतचे अंतर पायदळ चालावे लागते. गोंदियाच्या आगार प्रमुखांनी लक्ष देवून सडक/अर्जुनी येथे मुख्य बस स्थानक शिवमंदिर व दुसरे बस स्थानक हे पेट्रोल पंपजवळ द्यावे, अशी मागणी होत आहे. या दोन बसस्थानकांमुळे प्रवाशांना त्रास होणार नाही व त्यांना त्यांच्या गंतव्य ठिकाणी पोहचणे सोईस्कर ठरेल.
दोन बस स्थानकांची मागणी पूर्ण झाल्यास त्या ठिकाणी प्रवाशांना उभे राहण्यासाठी तात्पुरता लोखंडी निवारा तयार करावे, अशी नागरिकांची मागणी आहे. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे. (शहर प्रतिनिधी)