एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाने प्रवाशांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 11:32 PM2018-06-08T23:32:27+5:302018-06-08T23:32:27+5:30
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी गुरूवारी मध्यरात्रीपासून पुकारलेल्या बंदला तिरोडा आगारातील कर्मचाऱ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे दुपारी ४ वाजतापर्यंत एकही बस आगाराबाहेर पडली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी गुरूवारी मध्यरात्रीपासून पुकारलेल्या बंदला तिरोडा आगारातील कर्मचाऱ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे दुपारी ४ वाजतापर्यंत एकही बस आगाराबाहेर पडली नाही. मात्र बाहेरून आलेल्या बसेस सुरळीतपणे रवाना करण्यात आल्या. तर गोंदिया आगारात संपाचा काहीच परिणाम दिसून आला नाही. या आगारातील बससेवा सुरळीतपणे सुरू होती.
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिलेली पगारवाढ मान्य नसल्यामुळे गुरूवारी (दि.७) रात्री १२ वाजतापासून एस.टी. कर्मचारी बेमुदत संपावर गेले. त्यामुळे तिरोडा आगारातील ४५ बसेस आगारात उभ्याच होत्या. ७० चालक, ६५ वाहक व २० इतर कर्मचारी संपावर गेले आहेत. बसफेऱ्या न झाल्याने सुमारे चार लाख रूपयांचे उत्पन्न बुडाले. एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांचे हाल झाले. अप-डाऊन करणाऱ्या नोकरदार वर्गांना ये-जा करण्यास बसेस उपलब्ध नसल्यामुळे त्यांना नोकरीच्या ठिकाणी जाता आले नाही. इतर प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. त्यामुळे अनेक प्रवाशांना काळी पिवळी वाहनाचा आधार घ्यावा लागला. तिरोडा आगाराचे व्यवस्थापक प्रकाश दांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोंदिया, भंडारा, साकोली व नागपूर येथून आलेल्या बसेस सुखरूपपणे पुढील प्रवासाकरिता सोडण्यात आल्या. तसेच संध्याकाळी पुरेसा पोलीस बंदोबस्त मिळताच काही बसफेऱ्या सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या संपामुळे असलेले कर्मचारी बस स्थानक परिसरात ठाण मांडून बसले होते. तर प्रवासी आपले सामान घेवून कोणती बस किंवा इतर साधन मिळेल याकरिता शोधाशोध करीत होते.